ज्यांना मोठे केले, तेच सोडून गेले ! माजी आमदार वैभव पिचड यांचा टोला  - Those who made it big, left it! Tola of former MLA Vaibhav Pichad | Politics Marathi News - Sarkarnama

ज्यांना मोठे केले, तेच सोडून गेले ! माजी आमदार वैभव पिचड यांचा टोला 

शांताराम काळे
गुरुवार, 18 मार्च 2021

लाभाचे पद दिले तरच हे खूष. मनाप्रमाणे पद मिळाले नाही, तर हे कुणाचेच नाहीत. त्यामुळे त्यांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नये.

अकोले : "माजी मंत्री मधुकर पिचड यांनी ज्यांना मोठे केले, तेच त्यांना सोडून गेले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देताना सर्व संचालकांचा विरोध डावलून त्यांना पद दिले, तरी ते म्हणतात आम्हाला काही दिले नाही. पंचवीस वर्षे जिल्हा परिषद सदस्य केले, हे ते विसरले का,'' असा टोला माजी आमदार वैभव पिचड यांनी सहकारी बॅंकेचे संचालक सीताराम गायकर व बाजार समितीचे सभापती परभत नाईकवाडी यांचा नामोल्लेख न करता केली. 

तालुक्‍यातील विकासकामांच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, ""त्यांनी कधीही समाजहिताचे काम केले नाही. स्वतःची घरे भरण्यासाठी राजकारण केले. स्वतःचे उद्योग-व्यवसाय वाढविले. लाभाचे पद दिले तरच हे खूष. मनाप्रमाणे पद मिळाले नाही, तर हे कुणाचेच नाहीत. त्यामुळे त्यांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नये.'' 

हेही वाचा.. थांबा त्यांची गंमत काढतो

""तालुक्‍यातील विविध प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी माजी मंत्री मधुकर पिचड यांनीच प्रयत्न केले. सध्या सुरू असलेली विकासकामेही माझ्या काळात मंजूर झालेली आहेत. विद्यमान आमदारांनी कामे मंजूर करून आणावीत व मग त्यावर बोलावे. त्यांना अर्थसंकल्पात तालुक्‍यातील विकासकामांना निधी आणता आला नाही.'' सूत्रसंचालन अरुण शेळके यांनी केले. 

हेही वाचा... अर्सेनिक अल्बम संशयाच्या भोवऱ्यात

तुम्हीच आमचा पक्ष 

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पक्षप्रवेशावेळी अनेकांची नावे यादीत होती. त्यांतील काही जणांनी आज माजी मंत्री मधुकर पिचड यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. "आम्ही तुमच्यासोबतच आहोत. आम्हाला पक्ष महत्त्वाचा नसून, तुम्ही महत्त्वाचे आहात. तुम्हीच आमचा पक्ष आहात,' असे त्यांनी सांगितले. 
 

हेही वाचा... 

आघाडी धर्म पाळणे महत्त्वाचे ः नवले

अकोले : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आमचा मित्र पक्ष असून, त्याची संघटन शक्ती वाढल्यास त्याचा आघाडीला फायदा होईल, मात्र आघाडी धर्म पाळणे तितकेच महत्वाचे आहे. नेते व त्यांचे सहकारी राष्ट्रवादीत स्वगृही गेले, याचे आश्चर्य वाटण्याचे मुळीच कारण नाही. मात्र त्यांच्या जाण्याने शिवसेना, काँग्रेस यांच्याबरोबर राजकीय फायद्याचे संतुलन सांभाळणे महत्वाचे आहे व ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जबाबदारी आहे, असे मत काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते मधुकर नवले यांनी सांगितले.

सध्या अकोले तालुक्यात राष्ट्रवादी प्रवेशावरून जोरदार चर्चा असून, गायकर राष्ट्रवादीत गेल्याने त्यांच्या पासून काही दूर सरत त्यांनी माजी आमदार वैभव पिचड यांची भेट घेऊन आपला पाठिंबा व्यक्त केला आहे. त्या पार्श्वभूमीवर नवले यांचे वक्तव्य महत्त्वाचे आहे. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख