जे सोडून गेले, त्यांना लोकही सोडून देतील, अजित पवार यांची पिचड यांना फटकेबाजी - Those who left, people will also leave, Ajit Pawar's hitting the pitcher | Politics Marathi News - Sarkarnama

जे सोडून गेले, त्यांना लोकही सोडून देतील, अजित पवार यांची पिचड यांना फटकेबाजी

विलास कुलकर्णी
शनिवार, 30 जानेवारी 2021

जे लोक पडत्या काळात आपल्याला सोडून गेले, ते पडले. त्यांची काय अवस्था झाली, हे तुम्हीच पहा. त्यांना लोकही सोडून देतील.

राहुरी : ``जे लोक पडत्या काळात आपल्याला सोडून गेले, ते पडले. त्यांची काय अवस्था झाली, हे तुम्हीच पहा. त्यांना लोकही सोडून देतील,`` असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपमध्ये गेलेेले माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभव पिचड यांना लहावला.

आज राहुरी येथे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत वांबोरी, आरडगांव, ताहाराबाद, बाभुळगाव, गणेगाव व शिरापूर (ता. पाथर्डी) येथील सौर ऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन, राहुरी खुर्द येथील वीज उपकेंद्राच्या वाढीव क्षमतेच्या ट्रान्सफार्मरचे लोकार्पण झाले. या वेळी मंत्री पवार बोलत होते.

उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, माजी खासदार प्रसाद तनपुरे, आमदार संग्राम जगताप, आमदार लहू कानडे, आमदार आशुतोष काळे, निर्मला मालपाणी, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, अनुराधा आदिक, बेबी सोडनर, धनराज गाडे, अनिता पोपळघट, सुरेश वाबळे, संदीप वर्पे, मच्छिंद्र सोनवणे, धीरज पानसंबळ, संतोष आघाव, गोविंद मोकाटे, रोहिदास कर्डिले उपस्थित होते.

केंद्राच्या नाकर्तेपणामुळे हजारे यांच्यावर उपोषणाची वेळ

पवार म्हणाले, की उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, "केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे अण्णा हजारे यांच्यावर उपोषणाची वेळ आली. त्यांनी भाजपाच्या नेत्यांवर विश्वास ठेवून, उपोषणापासून परावृत्त झाले. परंतु त्यांच्यावर पुन्हा अशी वेळ येऊ नये. केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर कृषी कायदे मंजूर केली. त्याविरुद्ध दिल्ली येथे लाखो शेतकरी जिवाची पर्वा न करता आंदोलन करीत आहेत. प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीला दुर्दैवाने हिंसक वळण मिळाले. परंतु, शेतकरी कधीही हिंसक आंदोलन करीत नाही. दिल्लीतील ट्रॅक्टर रॅलीला कुणीतरी गालबोट लावून बदनाम करण्याचा प्रयत्न केला."

मामाच्या मागे लागा

राज्यमंत्री तनपुरे यांची फिरकी घेतांना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले,  "मी पहिल्यांदा राज्यमंत्री झालो. तेव्हा माझ्याकडे तीन खाते होते. प्राजक्त यांना सहा खाते मिळाले. त्यांनी जिल्ह्यातील सर्व सहकाऱ्यांकडे लक्ष द्यावे. निळवंडे कालव्याच्या कामांसाठी मामांच्या (जलसंपदा मंत्री जयंत पाटील) मागे लागा. अन्यथा तुमचा मामा होईल. मी तुमच्या पाठीशी खंबीर आहे. जिल्ह्यातील नवे चेहरे उत्साहात विकास कामे करतील. मतदारांनी त्यांना यापुढेही साथ द्यावी." असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख