थोरातांच्या भगिणी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी जपलाय जात्यावरील ओव्यांचा छंद - Thorat's niece, Mayor Durga Tambe, is fond of poems on Japlay caste | Politics Marathi News - Sarkarnama

थोरातांच्या भगिणी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी जपलाय जात्यावरील ओव्यांचा छंद

आनंद गायकवाड
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

संगमनेर शहराच्या प्रथम नागरिक म्हणून जबाबदारी स्विकारलेल्या नगराध्यक्ष, शहरासह आपल्या कुटूंबाचीही जबाबदारी हसतमुखाने सांभाळणाऱ्या गृहिणी, कुशल राजकारणी व समाजकारणी अशा असंख्य भुमिका दुर्गा तांबे लिलया पार पाडीत असतात.

संगमनेर : राजकारणी व्यक्तींना छंदामध्ये फारसे स्वारस्य व तितकासा वेळही नसतो. मात्र संगमनेरच्या नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी आपल्या दैनंदिन व्यग्र दिनक्रमातून वाचनासह इतर अनेक छंद जोपासले आहेत. त्यातच जात्यावरच्या पारंपरिक ओव्यांचे संकलन करुन त्या प्रसंगानुसार तितक्याच ताकदीने सादर करण्याचा छंद त्यांनी जपला असून, या संकलनाचे पुस्तकही त्यांनी प्रकाशित केले आहे. दुर्गा तांबे या महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या भगिणी आहेत.

संगमनेर शहराच्या प्रथम नागरिक म्हणून जबाबदारी स्विकारलेल्या नगराध्यक्ष, शहरासह आपल्या कुटूंबाचीही जबाबदारी हसतमुखाने सांभाळणाऱ्या गृहिणी, कुशल राजकारणी व समाजकारणी अशा असंख्य भुमिका दुर्गा तांबे लिलया पार पाडीत असतात. या बरोबरच अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील पारंपरिक ओव्यांचे संकलन केले आहे.

हेही वाचा.. जिल्हा बॅंकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांचा निर्णय एकत्रित बसून घेऊ

ग्रामीण भागातील विविध प्रसंगी भाऊ, बहिण, आई, वडील, पती, मुलगा, मुलगी यांच्यावर आधारलेल्या, त्यांची स्तुती करणाऱ्या, विविध भाव भावनांचा अविष्कार करणाऱ्या असंख्य ओव्या ग्रामीण भागातील महिलांना मुखोद्गत असतात.

पूर्वीच्या काळी जात्यावर धान्य दळताना उर्जा मिळण्यासाठी पारंपरिक रितीने रचलेल्या लयबध्द ओव्या गायल्या जातात. बालपणी आई मथुराबाईंनी गायलेल्या ओव्यांचा कायम स्वरुपी ठसा त्यांच्या मनावर उमटला. पुढे काळाच्या ओघात त्याकडे दुर्लक्ष झाले तरी, मनातील ओव्यांसह त्यांनी सासरी प्रयागाबाई तांबे, मंजुळाबाई नवले यांच्याकडून ऐकलेल्या असंख्य विविध प्रकारच्या ओव्या त्यांनी शब्दबध्द करुन ठेवल्या होत्या. अनेक सार्वजनिक कार्यक्रमात त्यांनी त्या स्वतःच्या आवाजात गायल्याही आहेत. 

हेही वाचा.. शिवाजी कर्डिले यांचा दणदणीत विजय

या ओव्यांच्या संकलनाचे पारंपरिक ओव्या या पुस्तकाची पहिली आवृत्ती 2009 साली जयहिंद महिला मंचाने प्रकाशित केली आहे. त्यानंतर या पुस्तकाच्या चार आवृत्त्या प्रकाशित झाल्या, तर नुकतेच त्यांचे बंधू व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या पुस्तकाची पाचवी आवृत्ती प्रकाशित झाली आहे.

या आवृत्तीला गीतकार, कवी बाबासाहेब सौदागर यांची प्रस्तावना लाभली असून, ज्येष्ठ गायीका आशा भोसले यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या पुस्तकात लेकीचा जन्म, खेळ गाणी, लग्नाची चिंता, मागणी, वरमाई, बहीणभाऊ, मायलेकींचे हळवे नाते, डोहाळे, बाळाचा जन्म, शेती, सण समारंभ, माहेरची ओढ, उखाणे असे असंख्य प्रकार हाताळले आहेत.

ग्रामीण भागात मौखिक परंपरेतून पिढ्यानपिढ्या जपलेला हा सांस्कृतिक ठेवा नवीन पिढीसाठी उपलब्ध झाला आहे. यासाठी त्यांना पती आमदार डॉ. सुधीर तांबे, मुले सत्यजीत, डॉ. हर्षल, त्यांच्या सुना आदींचा पाठींबा मिळाला आहे. आपल्या व्यग्र दिनक्रमातून दुर्गा तांबे यांनी जोपासलेल्या या छंदाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील अशा प्रकारच्या ओव्या संकलन करण्याची गरज व्यक्त होत आहे.
 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख