फडणवीस यांच्या आरोपांना थोरात यांचे खरमरीत उत्तर - Thorat's honest answer to Fadnavis' allegations | Politics Marathi News - Sarkarnama

फडणवीस यांच्या आरोपांना थोरात यांचे खरमरीत उत्तर

मुरलीधर कराळे
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

स्वातंत्र्यलढ्यात ज्यांचे पूर्वज इंग्रजांना मदत करीत होते, त्यांनी आम्हाला देशप्रेम शिकवू नये. काॅंग्रेसचा गुपकर डिक्लेरेशनशी काहीही संबंध नसताना फडणवीस यांनी खोटे आरोप केले आहेत.

नगर : जम्मू काश्मिरमधील गुपकर डिक्लेरेशनमध्ये काॅंग्रेस सहभागी असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या मुंबईतील भाजप बैठकित केला. त्याला काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी खरमरीत शब्दांत उत्तर दिले आहे.

स्वातंत्र्यलढ्यात ज्यांचे पूर्वज इंग्रजांना मदत करीत होते, त्यांनी आम्हाला देशप्रेम शिकवू नये. काॅंग्रेसचा गुपकर डिक्लेरेशनशी काहीही संबंध नसताना फडणवीस यांनी खोटे आरोप केले आहेत. फडणवीस यांनी याबाबत थोडा अभ्यास केला असता तर बरे झाले असते, अशी टीका थोरात यांनी केली आहे.

मुंबईत भाजपच्या नवीन कार्यकारिणीची नुकतीच बैठक झाली. या वेळी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची रणऩीती ठरविण्यात आली. या बैठकित कार्यकर्त्यांना संबोधित करताना फडणवीस यांनी काॅंग्रेसवर बेछुट आरोप केले. महेबुबा मुफ्ती यांनी तिरंग्याच्या विरोधात विधान केल्याचे त्यांनी म्हटले. तसेच गुपकर डिक्लेरेशनमध्ये काॅंग्रेस सहभागी असून, काश्मीरमधील 370 कलम पुन्हा लागू करण्याबाबत गुपकर डिक्लेरेशनचे घाटत आहे. असे असताना काॅंग्रेस त्यांना साथ देत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता. तसेच काॅंग्रेस नेत्यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. 

त्यांच्या पूर्वजांनी इंग्रजांना मदत केली

या आरोपांना उत्तर देताना थोरात यांनी म्हटले आहे, की राज्यातील जनतेने भाजपला सत्तेतून दुर केले तरीही भाजपची खोटे बोलण्याची सवय गेली नाही. गुपकर डिक्लेरेशनचा काॅंग्रेसशी काहीही संबंध नसताना केवळ आरोप करायचे म्हणून त्यांनी खोटे बोलून काॅंग्रेसला बदनाम करण्याचा सपाटा लावला आहे. काॅंग्रेस पक्षाने देशाच्या स्वातंत्र्याची लढाई लढली आहे. अनेक काॅंग्रेस नेत्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावूून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. इंदिरा गांधी, राजीव गांधी अशा अनेक नेत्यांनी बलीदान दिले. असे असताना ज्यांचे पूर्वज त्या काळी इंग्रजांना मदत करीत होते, त्यांनी आम्हाला देशप्रेम शिकवू नये.

त्या वेळेस भाजपने देशप्रेम खुंटीला टांगले होते

तब्बल 52 वर्षे आपल्या मुख्यालयात तिरंगा न फडकविणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक फडणवीस आता विलाप करीत आहेत. 2017 साली याच महेबूबा मुफ्ती यांनी तिरंग्याच्या विरोधात विधान केले होते, त्या वेळी भाजप त्यांच्यासोबत सत्तेत होता. काॅंग्रेसने याबाबत राजीनामा मागितला होता, त्या वेळी भाजप सत्तेला चिकटून बसला. महेबूबा मुफ्तींसोबत काश्मीरची सत्ता उपभोगताना भाजपने आपले देशप्रेम खुंटीला टांगून ठेवले होते का, असा सवाल थोरात यांनी केला.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख