संगमनेर : सुमारे वर्षभरापूर्वी सुरु झालेला कोरोना महामारीचा प्रकोप अद्याप पूर्णपणे थांबलेला नाही. मात्र त्यात काहीशी घट झाल्याने, बेफिकीर नागरिकांनी कोरोनाचे नियम पायदळी तुडवले आहेत. मात्र आता कोरोनाची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, आज महसूल आणि पोलिस प्रशासनाने शहरातून जनजागृती फेरी काढीत नागरिकांचे प्रबोधन केले.
कोरोनाची सुरूवात नगरमध्ये झाली, त्या वेळी संगमनेर शहरात कोरोनाने हाहाकार उडाला होता. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा मतदारसंघ असलेल्या या भागात कोरोना आटोक्यात येत नव्हता. त्यामुळे माजचा अनुभव पाहता संगमनेर शहर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी सज्ज झाले आहे.
हेही वाचा... कृषी विद्यापीठाचे मोठे काम
गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाच्या प्रतिबंधासाठी गरजेचे असलेल्या मास्क, वारंवरा हात धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर व योग्य शारिरीक अंतर या महत्वाच्या त्रिसूत्रीचा नागरिक व व्यापारी वर्गाला विसर पडला आहे.
दुकानांसमोरील सॅनिटायझर डिस्पेंन्सर शोभेची वस्तू ठरले आहेत. विविध वस्तूंच्या विक्रीची तसेच खाद्यपेयांची दुकाने ओसंडून वाहत आहेत. सर्वकाही सामान्य असल्याच्या थाटात वागत असल्याने लग्नासह विविध समारंभातही मोठी गर्दी होत आहे. या पार्श्वभुमिवर पुन्हा उद्भवू पाहणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाने पून्हा कंबर कसली आहे.
हेही वाचा... पाठकबाई म्हणते, रोहित पवार हेच खरे राणादा
आज प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने, संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख, घारगावचे सुनिल पाटील, तालुका पोलिस ठाण्याचे पांडुरंग पवार, आश्वी पोलिस ठाण्याचे सुधाकर मांडवकर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांनी शहरातून फिरत कोरोनाचा धोका टाळण्याचे आवाहन नागरिकांना केले.
मास्कचा वापर व दुकानदारांनी दुकानातली गर्दी कमी न केल्यास, पर्यायाने शहर लॉक डाऊन करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. कमीतकमी गर्दी टाळून गरज असल्यासच बाहेर पडण्य़ाचे आवाहन प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी केले आहे. तसेच लग्न समारंभ, हॉटेल यामध्ये 50 पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक गर्दी दिसल्यास दंड करण्यात येणार आहे. तसेच यावेळी विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली.
दरम्यान, मागील अनुभव पाहता संगमनेर जागे झाले असून, या वेळी कोणत्याही परिस्थितीत कोरोनाचा फैलाव होऊ द्यायचा नाही, असा निश्चय अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे आगामी काळात हे शहर कसे तोंड देते, हा औत्सुक्याचा विषय आहे.
Edited By - Murlidhar Karale

