थोरात म्हणतात, हा असेल माझ्या जीवनाचा आनंदाचा क्षण - Thorat says, this will be the happiest moment of my life | Politics Marathi News - Sarkarnama

थोरात म्हणतात, हा असेल माझ्या जीवनाचा आनंदाचा क्षण

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 14 जून 2021

निळवंडे धरण पूर्ण करून या दुष्काळी भागाला पाणी देणे हा आपल्या जीवनाचा ध्यास आहे. आगामी वर्षातील पावसाळ्यात निळवंडे धरणाचे पाणी कालव्यांद्वारे या भागाला देण्याचा प्रयत्न आहे.

संगमनेर : तालुक्यासह लाभक्षेत्रातील दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याच्या प्रगतीपथावर सुरु असलेल्या कामाची 64 ते 70 किलोमिटर लांबीच्या भागातील कामाची पहाणी नुकतीच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केली. निळवंडे धरणाचे पाणी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मिळेल, हा माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण असेल, असे ते म्हणाले. (Thorat says, this will be the happiest moment of my life)

तालुक्यातील कौठे कमळेश्वर, काथरवाडी, लोहारे, मेंढवण या परिसरात विविध ठिकाणची पहाणी करीत त्यांनी अधिकारी वर्गाकडून कामाचा आढावा घेतला. यावेळी समवेत आमदार डॉ. सुधीर तांबे, महेंद्र गोडगे, कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ आदींसह जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, कार्यकारी अभियंता गिरीश संघांनी, विवेक लव्हाट, उप कार्यकारी अभियंता प्रमोद माने, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम आदी उपस्थित होते.

ते म्हणाले, निळवंडे धरण पूर्ण करून या दुष्काळी भागाला पाणी देणे हा आपल्या जीवनाचा ध्यास आहे. आगामी वर्षातील पावसाळ्यात निळवंडे धरणाचे पाणी कालव्यांद्वारे या भागाला देण्याचा प्रयत्न असून, त्यादृष्टीने काम अत्यंत वेगात सुरू आहे. 2014 पर्यंत धरण पूर्ण करून कौठे कमळेश्वर, पिंपळगाव कोझिंरा, गणेशवाडी हे मोठे बोगदे मार्गी लावले आहेत. मात्र मागील पाच वर्षात काम थांबले होते. महा विकास आघाडी सरकार सत्तेवर येताच 2019 मध्ये मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी निळवंडे च्या कामाची बैठक घेऊन कामाला गती दिली. दोन जेसीबी मशीन सुरु असलेल्या कामावर आज 35 जेसीबी मशीन कार्यरत असून, कोरोना संकटातही रात्रंदिवस काम सुरू आहे. अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवीत कामाचा वेग कायम ठेवला आहे. अनेक ठिकाणी स्ट्रक्चरल कामेही पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे तातडीने पूर्ण करून या भागात या धरणाचे पाणी येईल तो आपल्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण असेल असेही ते म्हणाले.

आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले,की निळवंडे धरण व कालव्यांची कामे बाळासाहेब थोरात यांच्या हातून पूर्ण होणे नियतीच्या मनात होते. महा विकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतरच या कामाला खऱ्या अर्थाने गती मिळाली. राज्याच्या मंत्रीमंडळातील अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सांभाळतानाही त्यांचे या कामाच्या प्रगतीकडे सातत्याने लक्ष असते.

कालव्याची पहाणी करताना मंत्री बाळासाहेब थोरात यांचे धरणाच्या लाभक्षेत्रातील वडगावपान, निळवंडे, लोहारे, कासारे, मेंढवण, कौठे कमळेश्वर आदी गावातील ग्रामस्थांनी जोरदार स्वागत करुन कामाविषयी समाधान व्यक्त केले.

 

हेही वाचा..

मराठा समाजावर मुख्यमंत्र्यांकडून अन्याय

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख