कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीत काॅंग्रेस स्वबळावर लढण्याचे थोरात यांचे संकेत - Thorat hints that Congress will fight on its own in Karjat Nagar Panchayat elections | Politics Marathi News - Sarkarnama

कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीत काॅंग्रेस स्वबळावर लढण्याचे थोरात यांचे संकेत

निलेश दिवटे
रविवार, 20 सप्टेंबर 2020

आमदार रोहित पवार, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके आणि माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले यांना तालुक्यात दादा या टोपणनावाने बोलले जाते.

कर्जत : कार्यकर्त्याना साथ देणारा पक्ष म्हणजे काँग्रेस आहे. त्यामुळे युवकांनी निष्ठेने काम करीत सर्वसामान्य लोकांची कामे करावी. याचे हमखास फळ मिळेलच. विधानसभेच्या पुढचे पुढं पाहू, इतके सगळे एकत्र जमलाय मग नगराध्यक्ष कोणाचा होईल? असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्ष नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीत स्वबळावर लढण्याचे संकेत दिले.

कर्जत येथे  `गाव तेथे काँग्रेस आणि वार्ड तेथे काँग्रेस` कार्यक्रमाच्या प्रारंभप्रसंगी बोलत होते. या वेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, समन्वयक ज्ञानदेव वाफारे, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले व अॅड. कैलास शेवाळे, तालुकाध्यक्ष प्रा. किरण पाटील, कर्जत जामखेड युवक काँग्रेसचे अध्यक्ष नगरसेवक सचिन घुले, माणिकराव मोरे, दीपक पाटील, शहाजी भोसले, शंकरराव देशमुख, ज्योती गोळेकर, मीनाक्षी साळुंके, प्रतिभा भैलूमे, मोहिनी घुले आदी उपस्थित होते.

ते म्हणाले, की कर्जत तालुका काँग्रेसचा बालेकिल्ला होता. माजी मंत्री कै. आबासाहेब निंबाळकर, त्यानंतर कै. विठ्ठल राव भैलूमे यांनी नेतृत्व केले. येथील आगामी नगरपंचायत निवडणुकीत सर्व प्रभागातील सर्वांना एकत्र आणण्याचा केलेला प्रयोग राज्यभरात राबविण्यात येईल. केंद्र सरकार सर्वच आघाड्यावर अपयशी ठरले असून, त्यांनी दिशाभूल केली आहे. ते शेतकऱ्यांच्या विरोधी असून, कांदा निर्यात बंदिचा निर्णय दुर्दैवी आहे.

चार दादांचीच चर्चा

आमदार रोहित पवार, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके आणि माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले यांना तालुक्यात दादा या टोपणनावाने बोलले जाते. या चार दादांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायत निवडणुकीत इतिहास घडवू, असे सचिन घुले यांनी निर्धार करताच टाळ्यांचा कडकडाट करीत उपस्थितांनी दाद दिली.
 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख