नगर : जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वाटप केलेल्या कर्जामुळे शेतकरी कर्जबाजारी झाल्याचे आरोप करण्याआधी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. शशिकांत गाडे यांनी आधी त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांचे सात-बारा तपासावेत. त्यांनीही या कर्जाचा लाभ घेतल्याचे दिसून येईल, असा टोला भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी `सरकारनामा`शी बोलताना लगावला.
गाडे यांचा असा होता आरोप
नगर तालुक्यात एका कार्यक्रमात प्रा. गाडे यांनी कर्डिले यांच्यावर टीका करताना, जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून कर्डिले यांनी शेतकऱ्यांना कर्जबाजारी केले, असा आरोप केला होता. शिवसेनेने यापूर्वी आंदोलने करून शेतकऱ्यांचे सात-बारा कोरे केले होते. काॅंग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना शिवसेनेेने केलेले आंदोलन अद्यापही शेतकऱ्यांच्या स्मरणात आहेत. शिवसेना शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करते व जिल्हा बॅंक कर्जबाजारी करते. सध्या कोणत्याही शेतकऱ्यांची कर्जाची मागणी नसताना त्यांना कर्ज वाटप केले. आता मार्चनंतर हे कर्ज परत केले नाही, तर त्याला व्याजदर 12 टक्के लागेल. परिणामी शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होईल, असा आरोप प्रा. गाडे यांनी केला होता. तसेच कर्डिले यांनी कार्यक्रम घेऊन त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्याचे ते म्हणाले होते.
कर्डिले यांनी दिले उत्तर
या आरोपाला कर्डिले यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले, की सध्या शेतकरी अडचणीत आहेत. अतिवृष्टीमुळे खरीपाचे पिक हातचे गेले. शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. पिकांसाठी केलेला खर्चही वाया गेला. त्यामुळे रब्बीच्या पेरण्यांसाठी शेतकरी सावकाराच्या उंबरठे झिजवत होता. अत्यंत अडचणीच्या काळात जिल्हा बॅंकेने अत्यल्प दरात कर्ज वितरण करून शेतकऱ्यांना वाचविले आहे. शिवसेनेचे नेत्यांनी केलेल्या आरोपात काहीच तथ्य नाही. त्यांनी आधी त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांचे, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे उतारे तपासावेत. बहुतेकांनी हे कर्ज घेतले आहे. आरोप करायचा होता, तर कर्ज का घेतले, अशा शब्दांत कर्डिले यांनी प्रा. गाडे यांचा समाचार घेतला.
तर त्यांनी आत्महत्या करायची का
शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात कर्जरुपाने मिळालेली मदत ही शेतकऱ्यांच्या तोंडावर आनंद झळकविणारी ठरली आहे. पिके लागवडीसाठी कर्जच उपलब्ध झाले नाही, तर शेतकऱ्यांनी आत्महत्या करायची होती का, असा सवाल कर्डिले यांनी केला आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी विनाकारण आरोप करू नयेत, त्याचे परिणाम त्यांना शेतकऱ्यांकडून भोगावे लागतील, असा इशाराही कर्डिले यांनी बोलताना दिला.
महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत आहेत. अशा परिस्थिती या आरोप-प्रत्यारोपामुळे तालुक्यात मात्र राजकीय कलगीतुरा पाहण्यास मिळत आहे.

