जामखेड : बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींना विकासनिधी देण्याबाबत त्यांनी गैरसमज करून घेतला आहे. त्यांना ते चुकीचं वाटलं असेल. त्यांना विकासाचं काम कळत नसेल, त्याला मी काही करू शकत नाही. ते काय बोलतात, यापेक्षा लोकांना काय पाहिजे हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, अशा शब्दांत आमदार रोहित पवार यांनी भाजपचे माजीमंत्री राम शिंदे यांना उत्तर दिले.
जामखेड येथे प्रभागनिहाय बैठकित काल आमदार पवार बोलत होते. पवार यांनी बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतीला 30 लाखांचे बक्षिस जाहीर केल्यानंतर प्रा. शिंदे यांनी टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, की कदाचित गावामध्ये गट तट असावे, असा त्यांचा (राम शिंदे चा) हेतू असावा. असं माझं म्हणणं आहे. गावचा विकास करताना गट-तट बाजूला ठेवून राजकीय हेतू बाजूला ठेवून काम करायचं आहे. एखाद्या गावात ग्रामपंचायत बिनविरोध होत असेल, तर ती झाल्यावर त्या गावासाठी विकास निधी देऊ, असं म्हटल्यास यात काय चुकीचं आहे. त्यांना असं वाटलं असेल की, वेगळ्या पद्धतीने पैसे वाटले जातील. तर तसं काही नाही. त्यांना चुकीचं वाटलं आहे.
ते म्हणाले, "कोरोना महामारीने आपल्याला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे गावातील सर्व गट-तट बाजूला ठेऊन निवडणुकीसाठी होणाऱ्या खर्चास फाटा देत गावच्या विकासासाठी व हितासाठी ग्रामस्थांनी एकत्र येऊन काम करायचे आहे. आर्थिक खर्च वाचवण्याबरोबरच गावात असलेल्या राजकीय वादांना संपुष्टात आणण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करा अन् गावच्या विकासासाठी आपल्या गावांना ३० लाखांचा विकासनिधी घ्या, अशी साद आमदार रोहित पवार यांनी घातली आहे.
Edited By - Murlidhar karale

