महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात कोरोना चाचणी प्रयोगशाळा होणार - There will be a corona laboratory in the revenue minister's taluka | Politics Marathi News - Sarkarnama

महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात कोरोना चाचणी प्रयोगशाळा होणार

सरकारनामा ब्युरो
रविवार, 28 जून 2020

संगमनेरचे प्रांताधिकारी डाॅ. शशिकांत मंगरुळे यांनी ही माहिती आज सांगितली. संगमनेर तालुक्यात कोरोनाचा आकडा शंभरी पार केल्याने प्रशासनाने तातडीने हा निर्णय घेतला आहे.

नगर : जिल्ह्यात कोरोनामुळे सर्वांचीच चिंता वाढविली आहे. वाढते रुग्ण लक्षात घेता जिल्हा रुग्णालयात कोरोनाविषयक चाचण्या होऊ लागल्या. त्यामुळे रोज शंभर रुग्णांची तपासणी होणे शक्य झाले. उत्तर जिल्ह्याचे केंद्रस्थानी असलेल्या व कोरोनाची रुग्णसंख्या वाढतच असलेल्या महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा मतदारसंघ असलेल्या संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे कोरोनाविषयक चाचणी होण्यासाठी प्रयोगशाळेस परवानगी मिळाली आहे.

संगमनेरचे प्रांताधिकारी डाॅ. शशिकांत मंगरुळे यांनी ही माहिती आज सांगितली. संगमनेर तालुक्यात कोरोनाचा आकडा शंभरी पार केल्याने प्रशासनाने तातडीने हा निर्णय घेतला आहे.

रुग्णाच्या घशातील स्रावाची तपासणी स्थानिक पातळीवर करण्याची सोय व्हावी, यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते. या चाचणीला इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) संस्थेने परवानगी दिली आहे. त्यानुसार घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात ही प्रयोगशाळा सुरू होत आहे. "ट्रूनॉट' प्रणालीवर आधारित प्रयोगशाळा उभारणीची तांत्रिक प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. येथे चाचणी मोफत केली जाणार आहे. नवीन तंत्राच्या मदतीने अर्ध्या तासात एक, याप्रमाणे दोन तासांत चार अहवाल मिळू शकतात.

अशी यंत्रणा लोणीच्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयातही कार्यान्वित केली असून, तेथे सक्षमपणे सुरू आहे. जुलैच्या सुरवातीला प्रयोगशाळेचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे संगमनेर येथील रुग्णांचे नमुने तातडीने तपासता येणार आहेत.

अनेक वेळी संशयीत रुग्णांची वेळेत तपासणी होणे शक्य होत नाही. रुग्णसंख्या जास्त असल्यानंतर प्राधान्यक्रमाने त्रास होत असलेल्या रुग्णांची तपासणी करण्यात येते. तसेच एखाद्या रुग्णाच्या संपर्कातील लोकांच्या घशातील स्त्राव तपासणी प्राधान्याने होते. त्यामुळे इतर रुग्णांना वेळेत तपासणे शक्य होत नाही. संगमनेरला ही सुविधा झाल्यामुळे तेथील संशयितांची तातडीने तपासणी करण्यात येवून योग्य तो निर्णय घेता येणार आहे.

यापूर्वी जिल्ह्यातील सर्व रुग्णांचे स्त्राव तपासणीसाठी पुण्याला पाठविले जात होते. नगर शहरातील जिल्हा रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध झाल्याने अहवालही तातडीने येवू लागले. उत्तर नगर जिल्ह्यातील संगमनेर, कोपरगाव, राहाता, अकोले, श्रीरामपूर, राहुरी आदी तालुक्यांतील रुग्णांना संगमनेर येथे नेणे सोपे होणार आहे. त्यामुळे प्रशासनाचा मोठा ताण व वेळ वाचणार आहे. शिवाय रुग्णांचीही हेळसांड होणार नाही. 

जिल्ह्यातील आकड्यात वाढ

दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून, रोज नवीन भागातही रुग्ण सापडू लागले आहेत. नगर शहरात तर कोरोनाने धुमाकुळ घातला आहे. संगमनेरमध्येही स्थिती वेगळी नाही. अनेक भाग वारंवार हाॅटस्पाॅट करण्याची वेळ येत आहे.

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख