कर्जत-जामखेडमध्ये `वन-मॅन-शो` होतो, आता मी कोणासोबत हेच कळेना - There was a one-man show in Karjat-Jamkhed, now I don't know with anyone | Politics Marathi News - Sarkarnama

कर्जत-जामखेडमध्ये `वन-मॅन-शो` होतो, आता मी कोणासोबत हेच कळेना

मुरलीधर कराळे
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

पंचायत समितीतून तालुक्‍याचे अनेक प्रश्न सुटणार आहेत. त्यामुळे कोणी बहिष्कार घातला म्हणून कार्यक्रम होणार नाही, असे नाही.

 

नगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी श्रीरामपूर येथील कार्यक्रमात बोलताना आपण कसे खासदार झालो, हे स्पष्ट केले. उत्तरेतील राजकारण पाहता मी कोणासोबत आहे, हेच अजूनही कळत नाही, असे सांगून कर्जत-जामखेडमध्ये मात्र `वन-मॅन-शो` होते, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे उत्तरेतील राजकारणाबाबत लोखंडे यांनी व्यक्त केलेले मत भुवया उंचावणारे ठरले आहे.

श्रीरामपूर पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या भूमीपूजन सोहळ्यात नेत्यांनी अनेकांना कोपरखळ्या मारल्या. कार्यक्रमात आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुगली टाकली. ते म्हणाले, की विखे आणि मुरकुटे एकत्रित आल्याने खासदार सदाशिव लोखंडे यांना आपोआप संधी मिळणार. आम्ही जोपर्यंत खंबीर आहोत, तोपर्यंत लोखंडे यांची संधी जाणार नाही. त्यांनी फक्त काळजी घेतली पाहिजे, असे सांगितले. त्यानंतर खासदार लोखंडे यांनीही उत्तरेतील राजकारणावर प्रकाश टाकला.

खासदार लोखंडे म्हणाले, "माझा येथील उगम साडेसहा वर्षांपूर्वी झाला. आमदार होण्यासाठी ज्येष्ठ नेते भानुदास मुरकुटे यांच्याकडे आलो आणि खासदार झालो. शिवसेनेने उमेदवारी दिल्याने, अवघ्या 17 दिवसांत खासदार झालो. श्रीरामपूरच्या राजकारणात कोण कोणासोबत आहे, काहीच कळत नाही. आता मलाही कळेना, मी कोणासोबत आहे? कर्जत-जामखेडमध्ये आपण "वन मॅन-शो' होतो.''

श्रीरामपूर पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यात खासदार लोखंडे बोलत होते. खासदार झाल्याचे श्रेय त्यांनी मुरकुटे यांना दिले. लोखंडे पूर्वी जामखेड-कर्जतचे आमदार होते. त्या वेळी त्यांना विशेष स्पर्धक नव्हता. निवडून येणे सोपे होते. उत्तरेत मात्र राजकीय मंडळी जास्त आहेत. गट-तट जास्त आहेत. त्यांना तोंड देताना लोखंडे यांना नाकीनऊ झाले असावे. अत्यंत कमी कालावधीत निवडून येण्यामागे त्यांनी शिवसेनाच असल्याचे स्पष्ट केले. तसेच स्थानिक मुरकुटे यांना त्यांनी आपल्या विजयाचे श्रेय दिले.

या वेळी आमदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, ""पंचायत समितीतून तालुक्‍याचे अनेक प्रश्न सुटणार आहेत. त्यामुळे कोणी बहिष्कार घातला म्हणून कार्यक्रम होणार नाही, असे नाही. कोणासाठी अडथळा निर्माण करायचा आणि का, याचे आकलन झाले पाहिजे. तालुक्‍यातील मंडळी सुज्ञ आहेत.तालुका कोणाची खासगी मालमत्ता नाही. लोकप्रतिनिधी असल्याने मला विचारूनच कार्यक्रम झाला पाहिजे, मला विचारूनच अधिकारी आले पाहिजेत, हे वाईट आहे. चांगले काम केल्यास लोक तुम्हाला संधी देतील. अशाच प्रकारे वागलात, तर ही तुमची शेवटची संधी समजा,'' असा टोला आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला.

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख