नगर : "जिल्हा सहकारी बॅंकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची पत वाढत आहे. साखर कारखाने, सेवा संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधार मिळत आहे. आगामी काळात जिल्हा बॅंकेची वाटचाल प्रगतिपथावरच असणार आहे. बॅंकेतील ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित राहतील. हे करीत असताना वसुलीत कोणताही भेदभाव नसेल,'' असे मत जिल्हा बॅंकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष उदय शेळके यांनी "सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केले.
शेळके म्हणाले, ""जिल्हा बॅंक ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कामधेनू आहे. बॅंकेकडून मिळणाऱ्या सुलभ कर्जामुळे सावकारशाहीला आळा बसला आहे. नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना बॅंकेचा आधार आहे. या बॅंकेला ज्येष्ठ नेत्यांनी आपल्या कुटुंबाप्रमाणे जपले आहे. त्यांच्या प्रयत्नांतून बॅंक अव्वल स्थानी आहे. आगामी काळात बॅंकेचा नावलौकिक वाढविणार आहे. जीएस महानगर बॅंकेच्या कामकाजाचा अनुभव निश्चितच येथेही कामी येणार आहे.''
हेही वाचा... गडाखांबाबत विखेंनी काय मध्यस्थी केली
ते म्हणाले, "सर्व संचालकांनी विश्वास टाकून मला अध्यक्षपदी बसविले आहे. कोण कोणत्या पक्षाचा, कोण कोणत्या गटाचा, असा भेदभाव होणार नाही. वसुली करताना कोणीही शंका बाळगण्याचे कारण नाही. कोणत्याही बॅंकेच्या विकासात ठेवीदारांचा मोठा वाटा असतो. बॅंकेचे कामकाज चांगले असल्यास ठेवीही चांगल्या वाढतात. त्यामुळे कर्ज देणे सुलभ होते. कर्ज घेतल्यानंतर ते वेळेत परत करणे महत्त्वाचे असते. काही बॅंकेची हीच व्यवस्था ढासळते. त्यामुळे बॅंका डबघाईला येतात. वसुलीबाबत बॅंकांची भूमिका कायदेशीर व नियमांना धरून असायला हवी, असे माझे मत आहे. आगामी काळात वसुलीमध्ये कोणताही भेदभाव होणार नाही,'' असा विश्वास त्यांनी दिला.
हेही वाचा...
महापारेषणच्या विरोधात आंदोलन
अमरापूर : तालुक्यातील अमरापूर येथे महापारेषणच्या विद्युत मनोऱ्यावर तारा ओढताना पिकांचे नुकसान झाल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी हे काम बंद पाडले. भरपाई मिळेपर्यंत काम सुरू होऊ देणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.
अमरापूर येथे महापारेषण कंपनीच्या वतीने 220 केव्ही केंद्राची उभारणी करण्यात आली. या केंद्रास औरंगाबाद जिल्ह्यातील थापटी तांडा येथून वीजपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी थापटी तांडा ते अमरापूरदरम्यान विद्युत मनोरा उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. अमरापूर केंद्राचे कामही दोन वर्षांपूर्वी पूर्ण झाले आहे. मनोऱ्यावर वीजवाहिन्या ओढण्याचे काम बाकी होते. ते सध्या ठेकेदाराने सुरू केले आहे.
तालुक्यातील ठाकूर निमगाव परिसरात या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांमुळे व तारांमुळे पिकांचे नुकसान होत असल्याचा आरोप करीत मच्छिंद्र कातकडे, नानासाहेब काकडे, संभा कातकडे, परमेश्वर निजवे, पांडुरंग काकडे, बबन खंडागळे, रामेश्वर निजवे, जालिंदर निजवे यांच्यासह शेतकऱ्यांनी हे काम बंद पाडले. यापूर्वीही या कामामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. आताही तीच स्थिती आहे. त्यामुळे भरपाई मिळाल्याशिवाय काम सुरू होऊ देणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

