नगर : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असले, तरी बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. त्यामुळे सध्या तरी संपूर्ण लाॅकडाऊनची गरज नसल्याची माहिती प्रशासनाने दिली असून, तूर्तास संपूर्ण लाॅकडाऊनचा कोणताही निर्णय घेण्यात येणार नसल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
यापूर्वी भाजपचे खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी नगर शहराला संपूर्ण लाॅकडाऊनची गरज असून, जिल्हाधिकारी तसे का करीत नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच आपण स्वतः डाॅक्टर आहोत. खासदार म्हणून नव्हे, तर डाॅक्टर म्हणून सांगतो, लाॅकडाऊन करा, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यांच्या या मताला मात्र पालकमंत्र्यांनी आज एक प्रकारे ठेंगा दाखविला आहे.
पालकमंत्री मुश्रीफ यांनी आज लोकप्रतिनीधी, प्रशासकीय अधिकाऱ्यांची संयुक्तीक बैठक घेतली. त्यानंतर तूर्तास लाॅकडाऊन होणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले. सध्या श्रावण महिना सुरू असल्याने नागपंचमी, रक्षाबंधन, बकरी ईद, गोकुळाष्टमी, स्वातंत्र्यदिन असे विविध सण-उत्सव आहेत. त्यामुळे लोकांनी घरात राहून हे सण साजरे करावेत. सामाजिक अंतर पाळणे, मास्क वापरणे, सॅनिटायझरचा पुरेसा वापर अशा गोष्टी आवर्जुन पाळाव्यात. प्रशासनाने जिल्ह्यात कोरोना टेस्टसाठी विविध लॅबला परवानगी दिली आहे. तसेच बहुतेक ठिकाणी कोविड सेंटर उभारले आहेत. त्यामाध्यमातून रुग्णांना चांगल्या सुविधा दिल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता कोरोनावर मात करावी, असे मुश्रीफ यांनी सांगितले.
भाजपच्या नेत्यांकडून संपूर्ण लाॅकडाऊनची मागणी
दरम्यान, नगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत व गावांमध्ये कोरोनामुळे संपूर्ण लाॅक डाऊन केले आहे. नगर शहरात वाढते रुग्ण लक्षात घेता तेथेही संपूर्ण लाॅकडाऊनची अपेक्षा भाजपच्या काही नेत्यांनी केली होती. मात्र पालकमंत्र्यांनी आज त्याकडे दुर्लक्ष करीत नागरिकांची गैरसोय होऊ नये, जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे, असे कारणे देवून या मागणीला बगल दिली आहे.

