टाकळी ढोकेश्वर : जेष्ठ नेते शरद पवार यांचा परिवार आदर्शवत आहे. त्यांच्यापासून खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील सर्व परिवार बोध घेतात. पवार कुटुंबात कोणताचा वाद नाही. पार्थ पवार माझे चांगले मित्र असून, ते अंत्यत समजदार युवक आहेत. लवकरच त्यांच्या अडचणी थांबतील, याची शंभर टक्के मला खात्री आहे, असे सूचक वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री डाॅ. राजेश टोपे यांनी केले आहे.
टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथे आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या १ हजार बेडची क्षमता असणाऱ्या शरदचंद्र पवार कोविड सेंटरचे उद्घाटन टोपे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
टोपे म्हणाले, की कुटुंबात छोट्या गोष्टी घडत असतात, ती दुरुस्त करण्याची व्यवस्था पवार कुटुंबात आहे. कुटुंबातील सर्वच सदस्य अंत्यत कर्तुत्वान आहेत, आता तिसरी पिढी देखील आपले कर्तुत्व दाखवत आहेत. सर्वजण एकीने काम करत आहेत. पार्थ हा माझा जवळचा मित्र आहे, ते अंत्यत समजदार युवक आहेत. त्यांची कुठलीच अडचण राहणार नाही, याची मला शंभर टक्के खात्री आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची समाजाशी बांधीलकी आहे. राजकारणापेक्षा समाजकारणाला प्रथम प्राधान्य आमचे नेहमी आसते. हे कोविड सेंटर देखील याचे प्रतिक आहे.
लंके यांची सामान्य लोकांमधील आमदार ही ओळख आहे. ती ते सक्षमपणे हाताळत आहेत. सुपे येथे वाढती औद्योगिक वसाहत लक्षात घेता लंके यांनी मागणी केलेल्या
ट्रामा सेंटरचा विशेष बाब म्ह्णून त्याच्या मंजुरीचा नक्की विचार करू. या कोविड सेंटरमध्ये आल्यानंतर रूग्ण निश्चित आनंदीत होईल, कारण याची व्यवस्था मंदिरासारखीच केली आहे.
सरकाराचे काम सर्वांच्या बरोबरीने अतिशय सक्षमपणे सुरू आहे. शेतकरी हिताचे, रूग्णांच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. आता राज्यात कुठल्याच प्रकाराचे लाॅकडाऊन करण्यात येणार नाही, टप्प्याटप्याने सर्व काही सुरळीत सुरू करणार आहे, असे ते म्हणाले.
Edited By - Murlidhar Karale

