जामखेडचा कोरोनाशी लढा यशस्वी, तालुका झाला कोरोनामुक्त - There are no corona patients in Jamkhed | Politics Marathi News - Sarkarnama

जामखेडचा कोरोनाशी लढा यशस्वी, तालुका झाला कोरोनामुक्त

सरकारनामा ब्युरो
रविवार, 17 मे 2020

टप्प्याटप्याने येथे 17 जण कोरोनाबाधित आढळून आले. त्यांत 15 जण स्थानिक होते. त्यांपैकी 13 जण मागील आठवड्यात कोरोनामुक्त झाले. एका वृद्धाचा मृत्यू झाला. अखेरच्या रुग्णास आज नगरच्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याने जामखेड कोरोनामुक्त झाले.

जामखेड : परदेशी नागरिक कोरोनाबाधित आढळून आल्याने जामखेड राज्याच्या नकाशावर आले. हे नागरिक शहरात तब्बल 10 दिवस राहिले आणि 26 मार्चला पोलिसांना सापडले. तोपर्यंत त्यांनी कोरोनाचा वानवळा जामखेडकरांना दिला होता. टप्प्याटप्याने येथे 17 जण कोरोनाबाधित आढळून आले. त्यांत 15 जण स्थानिक होते. त्यांपैकी 13 जण मागील आठवड्यात कोरोनामुक्त झाले. एका वृद्धाचा मृत्यू झाला. अखेरच्या रुग्णास आज नगरच्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याने जामखेड कोरोनामुक्त झाले. 

जामखेडकरांनी दाखविलेले धैर्य, प्रशासकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या खडतर मेहनतीमुळेच जामखेड शहर कोरोनामुक्त होऊ शकले. मात्र, अजूनही जामखेडकरांपुढे अनेक आव्हाने आहेत. स्थलांतरित झालेले चाकरमाने मुंबई, पुणे, औरंगाबाद व राज्याच्या विविध भागांतून तालुक्‍यात येत आहेत. या सर्वांना 14 दिवस "क्वारंटाईन' करणे आवश्‍यक आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विलगीकरण कक्ष म्हणून वापराव्यात, अशी सूचना प्रशासनाकडून ग्रामसुरक्षा समितीला मिळाली आहे. मात्र, अनेक शाळा गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी आहेत. त्यामुळे त्या वापरणे कितपत योग्य आहे, हा प्रश्न आहे. 

ग्रामसुरक्षा समितीला अधिकार असले, तरी त्यांचा धाक नाही. त्यामुळे पोलिस प्रशासनाची अधिक मदत लागणार आहे. "हॉट स्पॉट' हटविल्याने ग्रामीण भागातले रस्ते पूर्ववत वाहू शकतात. अत्यावश्‍यक सेवेशिवाय कोणीही घराबाहेर पडणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. गर्दी होणारे व्यवसाय आणखी काही दिवस बंदच ठेवावे लागणार आहेत. कौटुंबिक सोहळ्याच्या परवानग्या तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागणार आहे. धार्मिक तीर्थस्थळेही काही काळ बंद ठेवावी लागणार आहेत. अत्यावश्‍यक सेवेचे फलक लावून अनेक जण तालुक्‍याबाहेर ये-जा करतात. त्यावर निर्बंध घालणे आवश्‍यक आहे.

हेही वाचा...

कर्जतकर म्हणतात, काही व्यवसायांना परवानगी हवीच

कर्जत : कोरोनाचा एकही रुग्ण आढळून न आल्याने, तसेच उपासमार होत असल्याने येथील व्यावसायिकांना अटी-शर्तींवर व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी, या मागणीचे निवेदन शहर भाजपतर्फे नायब तहसीलदार सुरेश वाघचौरे यांना आज देण्यात आले. 

उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, शहराध्यक्ष वैभव शहा, जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, अशोक खेडकर, अमृत काळदाते, मनीषा वडे, डॉ. कांचन खेत्रे, आशा क्षीरसागर, गणेश क्षीरसागर, रामदास हजारे उपस्थित होते. मागणीचे निवेदन वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल, असे आश्वासन वाघचौरे यांनी दिले. 

निवेदनात म्हटले आहे, की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व व्यावसायिकांनी खबरदारी आणि शासकीय आदेशाचे पालन करीत आपले व्यवसाय बंद ठेवले आहेत. मात्र, अनेक दिवसांपासून व्यवसाय बंद असल्याने व्यावसायिक आणि तेथील कामगारांची उपासमार होत आहे. येथे आजपर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण सापडला नाही. जिल्ह्यातील ज्या ठिकाणी रुग्ण सापडला नाही, त्या ठिकाणी तेथील प्रांत व तहसीलदार यांनी अटी आणि शर्तींवर दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. तशी परवानगी येथेही द्यावी, अशी मागणी करण्यात आली. 

कोरोना रुग्ण नाही
प्रशासनाच्या आदेशानुसार येथील दुकाने बंद आहेत. मात्र, कामगारांची उपासमार होत आहे. जिल्ह्यात ज्या ठिकाणी कोरोनाचा रुग्ण आढळून आला नाही, त्या ठिकाणी अटी-शर्तींवर परवानगी दिली आहे, तशीच परवानगी येथेही द्यावी 
- वैभव शहा, शहराध्यक्ष, भाजप, कर्जत 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख