Their politics benefited them! Minister Bhusen killed someone | Sarkarnama

त्यांचे राजकारण त्यांना लखलाभ ! मंत्री भुसेंनी कोणाला मारला टोला

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 28 मे 2020

महाविकास आघाडी सरकारने "बाळासाहेब ठाकरे स्मार्ट शेतकरी योजने'ची घोषणा केली. शेतकरी आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हावा, यासाठी योजनेंतर्गत प्रामुख्याने गटशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाईल.

नगर : "सध्या जगभर कोरोनाने थैमान घातले असून, त्यावर ठोस औषध उपलब्ध नाही. त्यात खरीप हंगाम तोंडावर आला आहे. अशा वेळी राजकारण करणे योग्य नाही. जे करीत असतील, त्यांना त्यांचे राजकारण लखलाभ. राज्यपाल भवन सर्वांसाठीच खुले आहे. सामान्य नागरिकही त्यांना भेटू शकतो. त्यामुळे ज्यांना राज्यपालांना भेटायचे आहे, त्यांनी भेटावे,'' अशा शब्दांत कृषिमंत्री दादा भुसे यांनी विरोधकांना टोला लगावला.  

जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगामाच्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मंत्री भुसे म्हणाले, ""खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर आला आहे. शेतशिवारात पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू आहेत. खरीप हंगामात शेतकऱ्यांना पेरणीसाठी खते, बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असतील. मागणी केल्यास, कृषी विभागाच्या समन्वयाने शेतकऱ्यांना बांधावर खते-बियाण्यांचा पुरवठा केला जाणार आहे. महाविकास आघाडी सरकारने "बाळासाहेब ठाकरे स्मार्ट शेतकरी योजने'ची घोषणा केली. शेतकरी आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हावा, यासाठी योजनेंतर्गत प्रामुख्याने गटशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाईल.'' 

नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, आमदार नीलेश लंके, आशुतोष काळे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित आदी उपस्थित होते. 

खतांचा काळाबाजार केल्यास कारवाई

""खरीप हंगाम आला, की खते-बियाण्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची लूट सुरू होते. मात्र, आता याद राखा. चढ्या भावाने विक्री केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील. शेतकऱ्यांची फसवणूक अजिबात खपवून घेणार नाही. असे गैरप्रकार आढळल्यास नुसती कारवाई नाही, तर कठोर शिक्षा केली जाईल. हे बोलून नव्हे, तर कृतीतून दाखवून देऊ,'' असा खणखणीत इशारा कृषिमंत्री भुसे यांनी दिला.

टोळधाडीवर खबरदारीचे निर्देश 
पाकिस्तानाच्या वाळवंटात टोळधाडीचे उगमस्थान आहे. तेथून मध्य प्रदेश व सातपुडा ओलांडून राज्यातील अमरावती जिल्ह्यात ही टोळधाड उतरली. टोळधाड आल्याचे कळताच, प्रतिबंधात्मक उपाययोजना तत्काळ करण्यात आल्या. औषधफवारणी करून योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश यंत्रणेला दिले असल्याचे भुसे यांनी सांगितले. 

बातम्यांचे अपडेट्स तातडीने मिळण्यासाठी 'सरकारनामा'चा ॲप डाऊनलोड करा.. सोबतची लिंक ओपण करा

https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.sarkarnama

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख