असा झाला सत्कार ! नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्यांचे पाय धुवून केले औक्षण - That's how it was! Newly appointed Gram Panchayat members washed their feet | Politics Marathi News - Sarkarnama

असा झाला सत्कार ! नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्यांचे पाय धुवून केले औक्षण

आनंद गायकवाड
सोमवार, 25 जानेवारी 2021

गावाच्या सर्वांगिण विकासासाठी ग्रामस्थांनी निवडून दिलेल्या ग्रामपंचायतींच्या नवनिर्वाचित कारभाऱ्यांचे पवित्र गंगाजलाने पाय धुवून, औक्षण करीत, झाडाचे रोप भेट देवून सत्कार करण्यात आला.

संगमनेर : गावाच्या सर्वांगिण विकासासाठी ग्रामस्थांनी निवडून दिलेल्या ग्रामपंचायतींच्या नवनिर्वाचित कारभाऱ्यांचे पवित्र गंगाजलाने पाय धुवून, औक्षण करीत, झाडाचे रोप भेट देवून सत्कार करण्यात आला. हा आगळावेगळा उपक्रम तालुक्यातील सावरगाव तळ या गावातील ग्रामस्थांनी आयोजित केला होता. 

भारतीय संस्कृती व धर्मशास्त्रानुसार गंगाजलाला पवित्र मानले जाते. गावाच्या विकासाच्या वाटचालीत महत्वाचा पाया असलेल्या ग्रामसंसदेवर निवडून आलेल्या सदस्यांनी पुढील पाच वर्षाच्या कार्यकाळात, पवित्र गंगाजलाप्रमाणे वागून, स्वार्थविरहीत विकासगंगा गावात आणावी या हेतूने, गुलाब पाकळ्या टाकलेल्या गंगाजलाने नवनिर्वाचित सदस्यांचे पाय धुवून त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

सर्व सदस्यांना झाडाचे रोपटे भेट म्हणून देत, वनसंपत्तीच्या रक्षणात अग्रेसर असलेल्या ग्रामस्थांनी वृक्षलागवडीचा संदेशही दिला आहे. चुरशिच्या निवडणूकांमुळे गावात मोठ्या प्रमाणात गटातटाचे राजकारण होते. मतदानासाठी दारू व पैसा यांचा वापर झाल्याने व्यसनाधिनता वाढते. संस्कारांचा लोप होतो व गावातील सामाजिक सौहार्द कमी होवून त्याचा परिणाम विकास कामांवर होतो. या गावाने मागील काळात जलसंधारण, मृदसंधारण आदींसह अनेक योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत.

राजकिय कटूता टाळून, दोन गटातील गावाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी 
पोलिस पाटील गोरक्ष नेहे, संतोष फापाळे आणि डॉ. शंकर गाडे यांनी मुख्य समन्वयकाची भूमिका पार पाडली. त्यांना दोन्हीही गटातील सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थांनी सहकार्य केले.

या वेळी पाणी फाउंडेशनचे राज्याचे मुख्य प्रशिक्षक संदेश कारंडे, विभागीय समन्वयक विक्रम फाटक, राजेंद्र जाधव, पोलिस पाटील गोरक्ष नेहे, वनपाल रामदास डोंगरे, विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. शंकर गाडे, संतोष फापाळे, रवी नेहे, नामदेव थिटमे, पोपट थिटमे, राजाराम फापाळे, विलास नेहे, शंकर नेहे, हरीश्चंद्र नेहे, रावसाहेब थिटमे, परशराम नेहे, कारभारी गाडे, पत्रकार गोरक्ष नेहे, संदीप थिटमे, माधव नेहे, रमेश नेहे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख