Thank you Thorat Saheb, this earth gave so much love! | Sarkarnama

थॅंक्यू थोरात साहब, बहुत प्यार दिया इस धरतीने !

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 19 मे 2020

संगमनेरात अडकलेल्या परप्रांतिय मजुरांनी आपल्या गावी पोचताच रामविलास वर्मा या मजुराने यशोधन कार्यालयात फोन करुन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

संगमनेर : ``साब, महाराष्ट्र हमे अपने घर जैसा लगता था. बहुत प्यार दिया इस धरतीने. कोरोना की वजहसे कुछ दिनों केलिए घर जा रहे हैं. मगर यकिन मानिये, हम फिर लौटकर आयेंगे. थँक्यू थोरात साहब,`` कातर स्वरातील त्या परप्रांतिय मजुरांच्या शब्दांनी यशोधनही थरारले. 

संगमनेरात अडकलेल्या परप्रांतिय मजुरांनी आपल्या गावी पोचताच रामविलास वर्मा या मजुराने यशोधन कार्यालयात फोन करुन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. 

कोरोनाच्या विश्वव्यापी संकटाने जगाचा चेहरा मोहरा बदलला आहे. उद्योगधंदे, व्यवसाय बंद झाल्याने सामान्य कष्टकरी, मजूरवर्ग, सामान्य मध्यमवर्गियांसह कारखानदारांचेही कंबरडे मोडले आहे. कोरोना प्रतिबंधासाठी पुकारलेल्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु झाला आहे. महिनाभर कसातरी दम काढलेल्या परप्रांतिय मजुरांनी जगायचे कसे, या विवंचनेत असलेल्यांनी गावी जाण्याचा मार्ग पत्कारला. वाहतूक बंद असल्याने हजारो किलोमिटरचे अंतर या मजुरांनी पायी, सायकल अथवा मिळेल त्या साधनाने कापले. रस्त्यातील दुकाने बंद असल्याने उपाशीपोटी रात्रंदिवस नाशिक- पुणे राष्ट्रीय महामार्गावरुन मजुरांचे जत्थे पाय ओढीत चालत होते. संगमनेर तालुक्यात अडकलेल्या सुमारे एक हजार 662 मजुरांना स्थानिक प्रशासन, सामाजिक संस्था, राजकिय पक्षांनी दोन वेळेस जेवणाचे डबे, भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा केला.

काबाडकष्ट करुन राहणाऱ्या या मजुरांनी महाराष्ट्रीयांना त्रास देण्यापेक्षा घराचा रस्ता धरला. या मजुरांना तालुक्यातील गावांमध्ये मिळालेले प्रेम व आपुलकीमुळे हे मजूर भावनाविवश झाले होते. तर काही मजुरांना नगरच्या रेल्वे स्थानकापर्यंत पोचवण्यात आले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीने अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या बसने मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, झारखंड या ठिकाणी जाणाऱ्या मजुरांच्या जेवण, औषधे व प्रवासाची व्यवस्था केली.

दहा वर्षांपासून महाराष्ट्रात कामधंद्यासाठी आलेल्या या कष्टकरी मजुरांनी महाराष्ट्रात मिळालेले प्रेम, आपुलकी इतरत्र कुठेही न मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ही मदत कधीच न विसरता येण्यासारखी असल्याचे सांगत, हे संकट संपताच आम्ही पुन्हा या कुटूंबात परत येणार असल्याची व येथील विकासकामात योगदान देणार असल्याची भावना व्यक्त केली.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख