ठाकरे सरकारकडून भाजप कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! - Thackeray government tries to suppress the voice of BJP workers! | Politics Marathi News - Sarkarnama

ठाकरे सरकारकडून भाजप कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न !

आनंद गायकवाड
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021

राज्य सरकार सोशल मिडीयाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची गळचेपी करीत आहे. कार्यकर्त्यांनी खंबीरपणे व न डगमगता सोशल मिडीयातून सरकारला धारेवर धरण्याचे काम सुरु ठेवावे.

संगमनेर : सोशल मीडियातून होणाऱ्या टीकेला घाबरल्याने ठाकरे सरकार कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून, त्यांचा आवाज दाबण्याचे काम करीत असल्याचा आरोप भाजपा सोशल मिडिया सेलचे प्रदेश संयोजक प्रवीण अलई यांनी केला.

संगमनेरातील इथापे आयुर्वेद महाविद्यालयात झालेल्या संगमनेर ग्रामीण मंडलाच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपाचे संगमनेर तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे होते. 

ते म्हणाले, की राज्य सरकार सोशल मिडीयाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची गळचेपी करीत आहे. कार्यकर्त्यांनी खंबीरपणे व न डगमगता सोशल मिडीयातून सरकारला धारेवर धरण्याचे काम सुरु ठेवावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील टीकेला जशास तसे उत्तर द्या. प्रसंगी गुन्हे दाखल करावे लागले तरी करा, पक्ष तुमच्या बरोबर राहील.

हेही वाचा... त्या शेतकऱ्यांकडून पैसे वसुलीत नगर नंबर वन

भाजपाचे अकोले तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे म्हणाले, की पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्मता मानवतावाद सिद्धांताच्या आधारे देशातील नरेंद्र मोदी सरकार कारभार करीत आहे. उज्ज्वला गॅस, अटल पेन्शन, प्रधानमंत्री घरकुल, जनधन या सारख्या लोककल्याणकारी योजना शेवटचा घटक व गरीब जनतेला समोर ठेऊन राबविल्या जात आहेत.

जिल्हा परिषद गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी भाजप इतिहास व विकास या विषयावर तर जिल्हा सरचिटणीस सुनिल वाणी यांनी भारतीय जनता पार्टीचा विचार व परिवार या विषयावर मार्गदर्शन केले.

हेही वाचा... आमदार लंके यांनी औद्योगिक प्रश्नाविषयी सुचविला पर्याय

या वेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अॅड. श्रीराज डेरे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सतिश कानवडे, अल्पसंख्याक आघाडी जिल्हाध्यक्ष असिफ पठाण, शहराध्यक्ष अॅड. श्रीराम गणपुले, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष शिरिष मुळे, ज्येष्ठ नेते रामचंद्र जाजू, जिल्हा उपाध्यक्ष सतिश सौदागर, जिल्हा सचिव मेघा भगत, राजेंद्र सांगळे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. 

प्रास्ताविक भरत फटांगरे यांनी केले. सूत्रसंचालन तालुका सरचिटणीस वैभव लांडगे यांनी केले, तर आभार वैद्यकीय सेलचे जिल्हा संयोजक डॉ. महेंद्र कोल्हे यांनी मानले.

दरम्यान, महाराष्ट्रभर सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यकर्ते विविध प्रश्न मांडत असतात. त्यांना ते एक प्रकारचे व्यासपीठ आहे. सरकारने अशा प्रश्नांच्या बाबतीत भाजप कार्यकर्त्यांना धारेवर धरू नये. त्यांच्यावर कारवाईची भाषा वापरली जाऊ नये, अशी मागणी या वेळी कार्यकर्त्यांनी केली.

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख