तहसीलदार मॅडमशी पंगा नडला ! सुजीत झावरे यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल - Tehsildar got into trouble with Madam! Serious charges filed against Sujit Jhaware | Politics Marathi News - Sarkarnama

तहसीलदार मॅडमशी पंगा नडला ! सुजीत झावरे यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल

मुरलीधर कराळे
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घेण्याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी गेल्यानंतर तेथे तहसीलदारांशी त्यांची शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यातूनच तहसीलदार देवरे यांनी झावरे यांच्याविरोधात फिर्याद दिली होती.

नगर : वाळु तस्करांचा कर्दनकाळ ठरलेल्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्याशी घेतलेला पंगा भाजपचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजीत झावरे यांना महागात पडले. देवरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार झावरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून, रात्री उशिरा त्यांना पुण्यात पोलिसांनी ताब्यात घेतले.

कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घेण्याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी गेल्यानंतर तेथे तहसीलदारांशी त्यांची शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यातूनच तहसीलदार देवरे यांनी झावरे यांच्याविरोधात फिर्याद दिली होती.

केंद्र सरकारने कांदा निर्यातीचा घेतलेला निर्णय शेतकरी विरोधात आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय मागे घ्यावा, या मागणीचे निवेदन घेऊन काल झावरे तहसीलदार देवरे यांच्याकडे गेले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ पाच लोकांनीच आत यावे, असे तहसीलदार देवरे यांनी सांगितले. मात्र अनेक कार्यकर्ते कार्यालयात घुसल्याने तहसीलदार व झावरे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. या वादातून दोघांनीही एकमेकांवर आरोप केले. त्यातूनच देवरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार झावरे यांच्यावर पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. विनयभंग, शासकीय कामात अडथळा, खंडणी अशा गंभीर आरोप झावरे यांना काल रात्री पुण्यात पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, झावरे स्वतःच पोलिस ठाण्यात दाखल झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

स्वपक्षीयाच्या विरोधात निवेदन

विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान झावरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. कांदा निर्यातबंदीबाबत केंद्र सरकारने घेतलेला निर्णय मागे घेण्यासाठी झावरे यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. स्वतः ज्या पक्षात आहेत, त्याच्याच विरोधात हे आंदोलन होते. परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी झावरे यांनी हे पाऊल उचलले. तथापि, गुन्हा दाखल झाल्याने राजकीय गोटातून चर्चा सुरू झाली आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख