नगर : मंत्र्यापेक्षा शिक्षकाचा मुलगा हीच ओळख मला महत्त्वाची वाटते. शिक्षकाचा मुलगा असल्याने त्यांचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी केले.
गुरुकुल शिक्षक मंडळ व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे आयोजित शिक्षकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य अध्यक्ष उदय शिंदे होते. शिक्षक नेते डॉ. संजय कळमकर, रा. या. औटी, संजय धामणे, भास्कर नरसाळे, सूदर्शन शिंदे, सीताराम सावंत, अंबादास झावरे, वृषाली कडलग, संतोष भोपे, राजेंद्र ठाणगे, संभाजी औटी आदी उपस्थित होते.
हेही वाचा... माझे वाढलेले महत्त्व त्यांना खपत नाही ः कर्डिले
गडाख म्हणाले, की 2005 नंतर नियुक्ती झालेल्या शिक्षकांना पेन्शन मिळणे गरजेचे आहे. शिक्षकांना आरोग्य देयके मिळण्यातील अडचणी दूर करण्यासह विविध प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांसह शिक्षणमंत्री व ग्रामविकास मंत्र्यांशी चर्चा करू. शिक्षकांच्या राज्यभरातील शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसह अधिकाऱ्यांशी चर्चा घडवून आणून सर्व प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न करणार आहे.
कळमकर म्हणाले, की राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा प्रतिनिधीस विधान परिषदेवर घेतल्यास शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यास मदत होणार आहे. 2005 नंतर नियुक्ती मिळालेल्या शिक्षकांना पेन्शन योजना लागू होणे गरजेचे आहे. त्यासाठी आपला प्रयत्न असून, मंत्री गडाख यांनी लक्ष घालून प्रश्न निकाली काढावा. प्रास्ताविक नितीन काकडे यांनी केले.
हेही वाचा... हिंमत असेल, तर काॅंग्रेसने बाहेर पडून दाखवावे ः विखे पाटील
हेही वाचा...
ज्ञानासाठी शालेय शिक्षण महत्वाचे : ऋषी
नगर : आपली विचारसरणी एकांगी बनली आहे. शिक्षणातील सर्जनशीलता हरवली आहे. पण हल्लीच्या काळातील मुलं व्यक्त होऊ लागली आहेत. इंटरनेट आणि मोबाईलमुळे अनेक गोष्टी कळायला लागल्या आहेत. मात्र, ज्ञान मिळवण्यासाठी शालेय शिक्षणच महत्वाचे आहे, असे प्रतिपादन जीकेएन सिंटर मेटल्स कंपनीचे प्लांट संचालक पुरुषोत्तम ऋषी यांनी केले.
सावेडीतील रेणाविकर शाळेत केंद्र सरकारच्या निती आयोगातर्फे सुरु केलेल्या अटल टिंकरिंग लॅबच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. व्हीआरडीईचे विवेक धावणे, विजय भालेराव, अतुल कुलकर्णी, डी. जे. नाईक, विनय चाटी, प्रमोद पाटील, मुख्याध्यापक प्रतिभा गायकवाड उपस्थित होत्या.
माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक सायसिंग वसावे यांनी स्वागत व परिचय करून दिला. या वेळी विद्यार्थ्यांनी मेकॅनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि रोबोटिक्सवर आधारित विविध उपकरणांचे प्रदर्शन, थीम प्लॅनेटोरियम, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे शाळेतील विविध उपक्रमांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या ड्रोनद्वारे संपूर्ण कार्यक्रमाचे चित्रीकरण करून यु-ट्यूबवर थेट प्रक्षेपित केले.
Edited By - Murlidhar karale

