The teachers also fight with Corona, shoulder to shoulder with the police | Sarkarnama

पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून शिक्षकांचीही कोरोनाशी लढाई

वसंत सानप
मंगळवार, 26 मे 2020

जामखेड तालुक्यात कोरोना पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या संकटातून बाहेर पडण्यासाठी विविध घटक आपल्या परिने कर्तव्य निभावत आहेत. यामध्ये  तालुक्यातील शिक्षक ही माघे नाहीत.

जामखेड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या अपत्तीप्रसंगी जामखेड तालुक्यात संघर्षाची लढाई सुरू आहे. यामध्ये तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गटशिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील साडेतीनशे शिक्षकांनी स्वतःला कर्तव्यासाठी वाहून घेतले आहे. पोलिसांसोबत रस्त्यावर उतरुन शिक्षक आपलं 'कर्तव्य' बजावत आहेत. त्यांच्या सेवेतील प्रामाणिकपणाचे समाजाच्या विविध स्तरातून कौतुक होतं आहे.

जामखेड तालुक्यात कोरोना पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या संकटातून बाहेर पडण्यासाठी विविध घटक आपल्या परिने कर्तव्य निभावत आहेत. यामध्ये  तालुक्यातील शिक्षक ही माघे नाहीत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाबरोबरच माध्यमिक व उच्यमाध्यमिक विद्यालयातील शिक्षक तालुक्यातील विविध चेकपोस्ट, नागरिकांच्या विलगीकरणासाठी ताब्यात घेतलेल्या शाळा, महाविद्यालयाच्या ठिकाणी 'कर्तव्य' निभावत आहेत. ऐरवी अतिरिक्त कामाचे ओझे झाले की आरडाओरडा करणारे, संघटनेच्या माध्यमातून आंदोलनाची भाषा करणारे शिक्षक या अपत्तीप्रसंगी स्वतःला झोकून देऊन कर्तव्य निभावताना दिसत आहेत. तालुक्यातील तब्बल साडेतीनशे शिक्षक आपलं कर्तव्य नियमित निभावत आहेत. त्यांच्यावर  नियंत्रण ठेवण्याचे काम केंद्रप्रमुख करीत आहेत. 

जामखेड तालुक्यात कोरोणाच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार विशाल नाईकडे यांनी विविध विभागाच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन कर्तव्यासाठी बोलावले आहे. ऐवढेच नाही, तर त्यांच्यावर विश्वास दाखवून काही अधिकाऱ्यांच्या खांद्यावर काही जबाबदाऱ्या  सोपविल्या आहेत. अशीच जबाबदारी गटशिक्षणाधिकारी नागनाथ शिंदेे यांच्या खांद्यावर सोपविली आहे. तालुक्यातील चेक पोस्ट व विलगीकरण कक्षाच्या ठिकाणी दररोज शिक्षकांना सेवार्थ तैनात ठेवण्याची जबाबदारी दिली आहे. त्यांनीही विश्वास सार्थ ठरवित 'चोख' कामगिरी बजावली आहे.

कामाची विभागणी

तालुक्यातील खर्डा, आरणगाव, चौंडीसह जामखेड शहरातील साकत फाटा, बीड रोड, नगर रोड, खर्डा रोड येथे असलेल्या चेक पोष्टवर पोलीस कर्मचारी, होमगार्ड, सेवानिवृत्त सैनिक, ग्रामसेवक, तलाठी,कोतवाल यांच्या खाद्यांला खांदा लावून 'शिक्षक' कर्तव्य पार पाडता आहेत. तालुक्यातील शिक्षकांना आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा 'कर्तव्य' (डियुटी) बजावण्याचे ठरले आहे. या साठी 'अ,ब,क ' असे तीन विभाग शिक्षकांचे केले असून, प्रत्येकी दोन दिवसप्रमाणे हे तिन्ही गटातील शिक्षक आपले कर्तव्य निभावत आहेत. प्रत्येक चेकपोष्टसाठी तीन शिक्षक असून, बारा तासाप्रमाणे दोन सत्रात त्यांचे काम सुरू आहे.

मुंबई पुण्यासह राज्याच्या विविध भागातून आलेल्या नागरिकांची नोंद, आले कोठून, चालले कुठे, या ठिकाणांच्या सर्व नोंदी घेत आहेत. दररोज दोन शिफ्टमध्ये हे शिक्षक आपले कर्तव्य बजावतात. केंद्रप्रमुखांच्या माध्यमातून त्यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवले जाते. तालुक्यातील 80 विलगीकरण कक्षाच्या ठिकाणी प्रत्येकी दोन, प्रमाणे तीन शिफ्टमध्ये शिक्षकांचे काम सुरू आहे. तसेच ज्या ठिकणच्या विलगीकरण कक्षात बाहेरून आलेल्या व्यक्ती ठेवलेल्या नाहीत, त्याठिकाणी नेमणूक केलेल्या शिक्षकाला गरजेनुसार अन्य ठिकाणी पाठविले जाणार असल्याचे नियोजन हाती घेण्यात आले आहे.

असे ठेवले जाते कामकाजावर नियंत्रण

तालुक्यात सुरु असलेल्या दैनंदिन कामकाजाचा अहवाल केंद्रप्रमुख गटशिक्षणाधिकारी यांना देतात आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून हा अहवाल तहसीलदार विशाल नाईकवाडे आणि गटविकास अधिकारी पी. पी. कोकणी यांना सादर केला जातो. गेल्या दोन महिन्यांपासून हे काम  सुरू आहे. या अपत्ती व्यवस्थापनप्रसंगी ज्यांच्याकडून कामचूकराई अथवा हलगर्जीपणा होईल, त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल, असे संबंधित शिक्षकांनी नेमणूक आदेश देतेवेळीच 'लेखी'  स्वरूपात गटशिक्षणाधिकार्यांनी कळविलेले आहे. अशा पध्दतीने कामाची विभागणी केल्यामुळे हेल्दी वातावरणात सर्वसमावेशक  कामाची परिणामकारकता अधिक प्रभावी होत आहे.

यांना वघळले कामकाजातून

दिव्यांग, अपंग,महिला, शुगर, बी. पी., शस्त्रक्रिया झालेले तसेच सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या शिक्षकांना या अपत्तीप्रसंगी 'कर्तव्यासाठी' बोलवले नाही,कामकाजातून वघळले आहे, असे गटशिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांनी सांगितले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख