विखे पाटलांचे व्याही ढोकणे यांचा पहिला सत्कार तनपुरे यांच्या हस्ते - Tanpure felicitates Vikhe Patil's Vyahi Dhokne | Politics Marathi News - Sarkarnama

विखे पाटलांचे व्याही ढोकणे यांचा पहिला सत्कार तनपुरे यांच्या हस्ते

विलास कुलकर्णी
सोमवार, 17 ऑगस्ट 2020

'तनपुरे' च्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सायंकाळी घरी परत जाताना ढोकणे यांची राहुरी शहरात नगर-मनमाड महामार्गावर पाण्याच्या टाकीजवळ मंत्री तनपुरे यांच्याशी अचानक भेट झाली.

राहुरी : तनपुरे साखर कारखान्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे व्याही नामदेवराव ढोकणे यांनी राहुरी येथील पहिला सत्कार नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते स्विकारला. 'चाय पे चर्चा' करून दोघांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. त्यामुळे राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या.

'तनपुरे' च्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सायंकाळी घरी परत जाताना ढोकणे यांची राहुरी शहरात नगर-मनमाड महामार्गावर पाण्याच्या टाकीजवळ मंत्री तनपुरे यांच्याशी अचानक भेट झाली. मंत्री तनपुरे यांनी शुभेच्छा देऊन सत्कार करताना दोघांमध्ये चाय पे चर्चा घडली. या वेळी जिल्हा परिषद सदस्य गोविंद मोकाटे, बाजार समितीचे संचालक दत्तात्रेय खुळे, नगरसेवक प्रकाश भुजाडी, एकनाथ तनपुरे उपस्थित होते.

तनपुरे साखर कारखाना भाजपा नेते माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील व भाजपा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील परिवर्तन मंडळाच्या ताब्यात आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष ढोकणे हे विखे पाटील यांचे व्याही आहेत. त्यांनी राष्ट्रवादीचे मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा पहिला सत्कार स्विकारल्याने चर्चेला वाव मिळाला. 

ढोकणे यांनी कारखान्याच्या रोलर पूजन प्रसंगी "तनपुरे कारखान्याला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी राजकारणाला थारा देणार नाही. विखे-तनपुरे-कर्डिले यांच्या मदतीने कारखान्याला स्वतःच्या पायावर उभा करण्याचा प्रयत्न करीन. तालुक्यातील ऊस उत्पादकांनी तनपुरे कारखान्यास ऊस द्यावा. प्रसंगी प्रसाद शुगरला ऊस दिला, तरी चालेल. परंतु तालुक्याबाहेर ऊस देऊ नका," असे आवाहन केले. हीच चर्चा मंत्री तनपुरे यांच्याशी झाल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, कारखान्याच्या अध्यक्षबदलाबाबत महाराष्ट्र राज्यात राजकीय वर्तुळातून चर्चा होत होती.
 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख