तनपुरेंनी पाठपुरावा केलाय, राहुरीसाठी भरपूर निधीची तरतूद : अजित पवार - Tanpur has followed suit, allocating a lot of funds for Rahuri: Ajit Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

तनपुरेंनी पाठपुरावा केलाय, राहुरीसाठी भरपूर निधीची तरतूद : अजित पवार

विलास कुलकर्णी
शनिवार, 30 जानेवारी 2021

राहुरी मतदार संघातील सहा सौर ऊर्जा प्रकल्प पूर्ण झाल्यावर १९ मेगावॉट वीजनिर्मिती होऊन, १९ हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल. कोरोनामुळे मागील वर्षी विकास कामांना ब्रेक लागला.

राहुरी : निळवंडे धरणाच्या कालव्याच्या कामांना निधी कमी पडू देणार नाही. राहुरी ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीसाठी निधी देऊ. राहुरी बस स्थानकाच्या साडेसतरा कोटी रुपयांच्या इमारतीचा प्रस्ताव माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी पाठपुरावा करून पाठविला आहे. त्यासाठी येत्या वर्षभरात खर्च होईल. तेवढ्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली.

आज राहुरी येथे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत वांबोरी, आरडगांव, ताहाराबाद, बाभुळगाव, गणेगाव व शिरापूर (ता. पाथर्डी) येथील सौर ऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन, राहुरी खुर्द येथील वीज उपकेंद्राच्या वाढीव क्षमतेच्या ट्रान्सफार्मरचे लोकार्पण झाले. या वेळी मंत्री पवार बोलत होते.

उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, माजी खासदार प्रसाद तनपुरे, आमदार संग्राम जगताप, आमदार लहू कानडे, आमदार आशुतोष काळे, निर्मला मालपाणी, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, अनुराधा आदिक, बेबी सोडनर, धनराज गाडे, अनिता पोपळघट, सुरेश वाबळे, संदीप वर्पे, मच्छिंद्र सोनवणे, धीरज पानसंबळ, संतोष आघाव, गोविंद मोकाटे, रोहिदास कर्डिले उपस्थित होते.

पवार म्हणाले, "राहुरी मतदार संघातील सहा सौर ऊर्जा प्रकल्प पूर्ण झाल्यावर १९ मेगावॉट वीजनिर्मिती होऊन, १९ हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल. कोरोनामुळे मागील वर्षी विकास कामांना ब्रेक लागला. आता निधी कमी पडू देणार नाही. नगरपालिकांना वैशिष्ट्यपूर्ण निधी देण्यास सुरुवात होईल. राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांचे ४५ हजार ७०६ कोटी वीजबिल थकीत आहे. नवीन ऊर्जा धोरणात थकबाकीवरील व्याज व विलंब आकार माफ करून राहिलेल्या बिलात ५० टक्के सवलत आहे. ऊर्जाविषयक पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी थकबाकी भरून, सहकार्य करावे."

 

Edited B y- Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख