तीन आमदारांच्या या तालुक्याला कोरोनाचा सर्वाधिक धोका - This taluka of three MLAs is most at risk from corona | Politics Marathi News - Sarkarnama

तीन आमदारांच्या या तालुक्याला कोरोनाचा सर्वाधिक धोका

मुरलीधर कराळे
सोमवार, 13 जुलै 2020

बहुतेक भाग हाॅट स्पाॅट झालेल्या नगर शहराच्या जवळ या तालुक्यातील गावे असल्याने कोरोनाचा सर्वाधिक धोका तेथील ग्रामस्थांना आहे.

नगर : कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रत्येक तालुक्यात संबंधित आमदार कसोशिने प्रयत्न करीत आहेत. मात्र तीन विधानसभा मतदारसंघात विभागलेल्या नगर तालुक्याकडे कोणाचेही विशेष लक्ष नाही. बहुतेक भाग हाॅट स्पाॅट झालेल्या नगर शहराच्या जवळ या तालुक्यातील गावे असल्याने कोरोनाचा सर्वाधिक धोका तेथील ग्रामस्थांना आहे.

पाचपुते या गावांमध्ये केव्हा येणार

श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव पाचपुते आहेत. या मतदारसंघात नगर तालुक्यातील आगडगाव, देवगाव, रांजणी, मेहेकरी, काैडगाव, चिचोंडी पाटील, वाळकी, गुंडेगाव, निंबोडी या प्रमुख गावांसह इतर अनेक गावे आहेत. श्रीगोंदे शहर व पाचपुते यांचे निवासस्थान या गावांपासून दूर असल्याने या लोकांचा थेट आमदारांशी विशेष संबंध येत नाही. निवडणुकीच्या काळात आमदारांनी या गावांमध्ये हेलपाटे मारले. आता मात्र त्यांचे दुर्लक्ष झाल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. या गावांतील लोक नगर शहरात रोज दुध व्यवसायानिमित्त जातात. शहरातील कोरोना तालुक्यात येण्यास वेळ लागणार नाही. मात्र आमदारांकडून विशेष प्रबोधन होताना दिसत नाही.

तनपुरे रमले राज्याच्या राजकारणात

राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या राहुरी येथील निवासस्थानापासून व कार्यालयापासून नगर तालुक्यातील गावे दूर आहेत. डोंगरगण, मांजरसुंबे, बहिरवाडी, पिंपळगाव, वारुळवाडी, बुऱ्हाणनगर या प्रमुख गावांबरोबर इतर गावांमध्ये तनपुरे यांचे येणे केवळ निवडणुकीच्या दरम्यान झाले. त्यानंतर मात्र त्यांचे इकडे विशेष काम निघालेच नाही. ही गावे नगर शहरापासून अत्यंत जवळ आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. डोंगरगणला तर एक रुग्ण सापडला असून, हे गाव सील केले आहे. अशा परिस्थितीत मंत्री म्हणून तनपुरे यांनी कोणतेच प्रयत्न गावासाठी केलेले दिसत नाही. ते राज्याच्या राजकारणात रमले आहेत. उर्वरित वेळेत राहुरी तालुक्याकडे त्यांची भिस्त आहे. नगर तालुक्यातील गावांकडे मात्र दुर्लक्ष असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. 

लंके यांच्याकडून अधिक उपाययोजना हव्यात

पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनी त्यांच्या मतदारसंघात असलेल्या व नगर तालुक्यातील काही गावांमध्ये निवडणुकीनंतर विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थिती दर्शविली, तथापि, नगर शहराजवळील ही गावे असल्याने पारनेर शहर व तालुक्याप्रमाणेच नगर तालुक्यातील गावांमध्येही त्यांनी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा या गावांमधून व्यक्त होत आहे. चास, देहरे परिसरातील गावे या मतदारसंघात येतात.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख