Taking credit for the work of the Center, beware! MP Vikhe Patil will lodge a complaint | Sarkarnama

केंद्राच्या कामांचे श्रेय घेताय, खबरदार ! खासदार विखे पाटील तक्रार करणार

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 30 जून 2020

आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासोबत आपण नगर तालुक्याचा दाैरा करणार आहोत, असे विखे पाटील यांनी या वेळी सांगितले. त्यामुळे विखे-कर्डिले यांच्यातील वाद आता संपुष्टात आला असल्याची भावना कार्यकर्त्यांची होत आहे.

नगर : केंद्राच्या निधीतून होणाऱ्या कामांचे लोकार्पण करून काही स्थानिक लोकप्रतिनिधी श्रेय घेतात. याला आता खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी ब्रेक लावला आहे. असे आढळल्यास ते तक्रार करणार आहेत. तसेच केंद्र सरकारच्या निधीतून होणाऱ्या विकास कामांचा आराखडा तयार करताना त्याची माहिती खासदारांना असायलाच हवी, याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.

जिल्हा परिषदेमार्फत विकास कामांचा आढावा घेताना केंद्र सरकारकडून येणाऱ्या निधीबाबत खासदार विखे पाटील यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "अनेक गावांत पाणीयोजना असतानाही तेथे टॅंकर सुरू करण्याची वेळ येते. यापुढे पाण्याची उपलब्धता तपासून घेतली जाईल. त्यानंतर पाणी योजना मंजूर केली जाईल. कारण जिल्ह्यात पाणीयोजना नावलौकिकासाठी झाल्या. हे यापुढे होणार नाही. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानासाठी केंद्राकडून आलेल्या 90 कोटींच्या निधीतून 36 कोटींचा निधी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामावर खर्च झाला आहे.'' 

सरपंचांचे काम चांगले

कोरोनाच्या संकटात 95 टक्के सरपंचांचे काम चांगले आहे. सरपंच रात्रीचा दिवस करून काम करीत आहेत. त्यामुळे आमदार व खासदारांचे निम्मे काम सोपे झाले आहे. यापुढेही सरपंचांना प्रोत्साहन देण्यासाठी नियोजन व्हावे. सध्या कोरोनामुळे राज्याची स्थिती बिकड झाली आहे. मंत्री लाॅक झाल्यामुळे जनता अनलाॅक झाली आहे. त्यामुळे कोरोनाविषयक जाळे अधिक वाढवावे लागेल, अशी अपेक्षा डाॅ. विखे पाटील यांनी व्यक्त केली.

 

आमदार कर्डिलेंसोबत दाैरा करणार

आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासोबत आपण नगर तालुक्याचा दाैरा करणार आहोत, असे विखे पाटील यांनी या वेळी सांगितले. त्यामुळे विखे-कर्डिले यांच्यातील वाद आता संपुष्टात आला असल्याची भावना कार्यकर्त्यांची होत आहे.

संगमनेरमध्ये अपयश

संगमनेरमध्ये कोरोना वाढण्याचे कारण म्हणजे तेथे प्रशासनाला योग्य पद्धतीने कामकाज करू दिले जात नाही. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. त्यामुळे प्रशासनाला मोकळीक देण्याची गरज आहे. त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती होऊन कामकाज हाताळण्यात यावे. तरच तेथील परिस्थिती नियंत्रणात येईल. कोरोनाला शहरातून बाहेर काढण्यासाठी खास उपाययोजना होण्याची नितांत गरज असल्याचे डाॅ. विखे पाटील यांनी सांगितले.

शरद पवार यांच्यावरील आरोप चुकीचे

शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर अशी खालच्या पातळीवर आरोप करणे चुकीचे आहे. हे व्यक्तिगत मत असल्याचेही डॉ. विखे पाटील यांनी स्पष्ट करून त्यांनी भाजपला घरचा आहेर दिला.  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख