शिर्डीतील त्या फलकावर "भूमाता'च्या समर्थकांनी फेकला काळा रंग  - Supporters of "Bhoomata" threw black paint on the billboard in Shirdi | Politics Marathi News - Sarkarnama

शिर्डीतील त्या फलकावर "भूमाता'च्या समर्थकांनी फेकला काळा रंग 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 7 जानेवारी 2021

तैनात असलेले सुरक्षारक्षक व पोलिसांनी दोन महिलांसह तिघांना ताब्यात घेतले. त्यानंतर लगेच फलक पुसून स्वच्छ करण्यात आला. अवघ्या पाच-सात मिनिटांत हे नाट्य संपुष्टात आले. 

शिर्डी : साईदर्शनासाठी भाविकांनी सभ्य पोषाखात यावे, असा मजकूर असलेल्या साईसंस्थानच्या विनंती फलकावर आज भूमाता ब्रिगेडच्या समर्थकांनी काळा रंग फेकून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तेथे तैनात असलेले सुरक्षारक्षक व पोलिसांनी दोन महिलांसह तिघांना ताब्यात घेतले. त्यानंतर लगेच फलक पुसून स्वच्छ करण्यात आला. अवघ्या पाच-सात मिनिटांत हे नाट्य संपुष्टात आले. 

साईसंस्थानने लावलेल्या फलकांवरील मजकूर हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे, अशी भूमिका घेत गेल्या 10 डिसेंबर रोजी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई येथील फलक हटविण्यासाठी शिर्डीला येत होत्या. मात्र, त्यांना नगर जिल्ह्याच्या सीमेवरच अडवून पोलिसांनी परत पुण्याला धाडले होते. त्यावेळी त्यांनी येत्या 31 डिसेंबरपर्यंत फलक हटविले नाहीत, तर पुन्हा शिर्डीत येऊन फलक हटवू, असा इशारा दिला. ग्रामस्थांनी एकत्र येत त्यांना विरोध करण्याची भूमिका घेतली होती. 

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास साईमंदिर परिसराच्या एक क्रमांकाच्या दरवाजाजवळ ही घटना घडली. या तिघांनी खाकी पाकीटातून काळे ऑईलसदृश्‍य पदार्थ एका फलकावर फेकला. पोलिस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या माहितीनुसार, या तिघांनीही आपण भूमाता ब्रिगेडचे समर्थक असल्याचे सांगितले. या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे म्हणाले, की श्रद्धा व सबुरी ही साईबाबांची शिकवण आहे. फलकांवर काळा द्रव पदार्थ टाकण्याचा प्रयत्न झाला. संस्थान सुरक्षारक्षकांनी हे फलक लगेच स्वच्छ केले. 

 

हेही वाचा....

घुले कारखाना निवडणुकीत 148 उमेदवारी अर्ज बाद 

नेवासे : भेंडे येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रियेत कालपासून (ता. 6) उमेदवारांची अर्जछाननीच्या टप्प्यापासून पुढे सुरू झाली. छाननीत 282 पैकी 148 अर्ज बाद ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली. 

कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच, कोरोनाचे संकट आले. उमेदवारीअर्ज दाखल करण्यात आलेल्या टप्प्यावर ही प्रक्रिया थांबली. राज्यात पुन्हा अनलॉक सुरू झाल्याने, सहकारी संस्थांच्या स्थगिती दिलेल्या निवडणूक प्रक्रियेस 4 जानेवारीपासून पुन्हा सुरवात झाली. ज्ञानेश्वर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया छाननीच्या टप्प्यापासून सुरू करण्यात आली.

संचालक मंडळाच्या 21 जागांकरिता 282 अर्ज आले होते. काल (बुधवारी) निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्जछाननी केली. त्यात तीन वर्षे ऊसपुरवठा न करणे, कारखाना व इतर सहकारी संस्थांची थकबाकी, ऊसपुरवठा कराराचा भंग (ऊसाची अन्य विल्हेवाट) या कारणांमुळे 148 उमेदवारीअर्ज बाद झाले. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख