राळेगण सिद्धी : नगरचे नवे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी आज राळेगण सिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची सदिच्छा भेट घेतली. जिल्ह्यातील शांतता, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अण्णांचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण भेटलो, असे पाटील यांनी सांगितले.
जिल्ह्यातील शांतता, कायदा व सुव्यवस्था राखण्याचे चांगले काम करावे. नगर जिल्ह्यात आयपीएस अधीकारी कृष्णप्रकाश, विश्वास नांगरे यांसारख्या अनेक अधिकाऱ्यांनी चांगले काम केले आहे. ती परंपरा आपण पुढे न्यावी, असे हजारे यांनी पाटील यांना सांगितले.
राज्याचे माजी ग्रामविकास तथा गृहमंत्री मंत्री (कै.) आर. आर. पाटील यांच्या निवडणुकीत आपण प्रचाराला गेलो होतो. विजयानंतर आबांनी आभार मानले होते. आर. आर. पाटील यांच्याकडे शुद्ध विचार, शुद्ध आचार, त्याग, निष्कलंक जीवन व चारित्र्य असे विविध गुण होते. अशी आठवण अण्णांनी पोलिस अधीक्षक पाटील यांच्याशी चर्चा करताना काढली.
नगर जिल्ह्यात हजर झाल्यानंतर हजारे यांची भेट घेण्याची इच्छा होती, परंतु कोरोना संसर्ग झाल्याने भेटीला उशीर झाला. महाविद्यालयात असताना एकदा राळेगणसिद्धीला येण्याचा योग आला होता. त्यावेळी हजारे यांचे राळेगणसिद्धीतील काम पाहून व भाषण ऐकून मी प्रभावित झालो होतो. हजारे यांच्याबद्दल मी खूप ऐकलेय, वाचले आहे. युपीएससीच्या अभ्यासाच्या वेळीही राळेगणसिद्धी व हजारे यांचा मी खूप अभ्यास केला होता. राज्याचे माजी गृहमंत्री (कै.) आर. आर. पाटील यांच्या सोबत सुरक्षा प्रमुख म्हणूनही राळेगणसिद्धीला आलो होतो. त्यानंतर आता हजारे यांच्या जिल्ह्यात नियुक्ती मिळाल्याचा आनंद आहे. हजारे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घ्यायला आवडेल, असे पाटील म्हणाले.
या वेळी पारनेरचे पोलिस निरीक्षक राजेंद्र गवळी, राजेंद्र भोसले, संजय पठाडे, श्याम पठाडे, भालचंद्र दिवटे आदी उपस्थित होते.
राळेगण सिद्धीत येताना ओढे, नाले वाहताना व बंधारे, पाझर तलाव भरलेले पाहिले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचे हे फलित आहे. आज मुलासोबत आलोय. काही दिवसांतच कुटूंबासह राळेगणसिद्धीला लवकरच दौरा करणार असून, पुन्हा एकदा राळेगण सिद्धी पाहण्यासाठी येणार आहे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.
Edited By - Murlidhar Karale

