नगर : दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी जनसामान्यांना अडचणीच्या काळात कायम मदतीचा हात दिला. आता त्यांच्या चाैथ्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्यांचे पूत्र आमदार राधाकृष्ण विखे पाटील व नातू खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजोपयोगी कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.
नगर जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर रूग्णांना आवश्यक असलेल्या रक्ताचे गांभिर्य लक्षात घेवून विखे पाटील यांच्या चौथ्या स्मृतिदिनाच्या निमिताने हा उपक्रम होत आहे.
शेती, सहकार, पाणी, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सामाजिक बांधिलकीने योगदान देणारे बाळासाहेब विखे पाटील यांचा चौथा स्मृतीदिन बुधवारी (ता. 30) आहे. यानिमित्त प्रवरा परिवाराच्यावतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, रक्तदान शिबिराबरोबरच प्रत्येक गावात वृक्षारोपण आणि गरजू व्यक्तिंना साहित्यांचे वाटप करण्यात येणार आहे. सकाळी ९ वाजता प्रवरानगर येथे स्मृतीस्थळावर प्रार्थना आणि स्वरसुमनांजली कार्यक्रमातून स्व. बाळासाहेब विखे पाटील यांना आदरांजली वाहाण्यात येईल.
कोरोना संकटाचे गांभीर्य अद्याप कमी झालेले नाही. रुग्णांना आवश्यक असलेल्या रक्ताचा तुटवडा रूग्णालयात निर्माण होत असल्याची परिस्थिती लक्षात घेवून इतर सर्व कार्यक्रमांऐवजी रक्तदान शिबिराचे आयोजन सात तालुक्यात केले असल्याचे आमदार विखे पाटील यांनी सांगितले.
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, प्रवरा मेडीकल ट्रस्ट, डाॅ. विखे पाटील फौंडेशन आणि जनसेवा फौंडेशनच्या सहकार्याने रक्तदान शिबीर सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यत आयोजित करण्यात आले आहे. लोणी येथे प्रवरा मेडीकल ट्रस्टचे रूग्णालय, राहाता शहरातील साई विठ्ठल लाॅन्स, आश्वी येथील प्रवरा कला वाणिज्य महाविद्यालय, श्रीरामपूर येथे कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणतांबा येथील आशा केंद्र, राहुरीच्या कला वाणिज्य महाविद्यालयाबरोबर नगर येथील डाॅ विखे पाटील फौडेशन आणि शेवगाव येथील आयुर्वेद महाविद्यालयात रक्तदान शिबीराचा उपक्रम होईल. कोरोना संकटाच्या काळात रूग्णांना आवश्यक असलेली रक्ताची गरज लक्षात घेवून इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन आमदार विखे पाटील यांनी केले आहे.लोकनेते पद्मभुषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी शेती सहकार शिक्षण आरोग्य क्षेत्रात काम करताना नेहमीच पर्यावरण चांगले राखण्यासाठी प्रयत्न केला. त्यांच्या कार्याची आठवण म्हणून दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचे नियोजन करण्यात येते.

