जामखेड : "घर देता, का घर' असा सवाल करीत खर्डा येथील मदारी समाजाने काल आमदार रोहित पवार यांच्या संपर्क कार्यालयासमोर "मदाऱ्यांचा खेळ' केला. तसेच तहसील कार्यालयासमोर कुटुंबीयांसह "पाल ठोको' आंदोलन केले.
ग्रामीण विकास केंद्र, जामखेड, लोकाधिकार आंदोलन आणि वंचित बहुजन आघडीतर्फे पुकारलेल्या आंदोलनाचे नेतृत्व आदिवासी भटके विमुक्त आघाडीचे राज्य सहसमन्वयक ऍड. अरुण जाधव यांनी केले. लोकाधिकार आंदोलनाचे प्रवक्ते बापू ओहोळ, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष द्वारका पवार, विशाल पवार, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष आतिष पारवे, हुसेन भाई मदारी, सरदार मदारी, सलीम मदारी, फकीर मदारी, समशेर मदारी, मेहबूब मदारी, रहीम मदारी, मुस्तफा मदारी आदींनी आंदोलनात भाग घेतला.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेची अंमलबजावणी करा, अशी मागणी करीत घोषणांनी तहसील कार्यालय परिसर दणाणून सोडला. तहसील कार्यालयाच्या आवारातच चुली पेटविल्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मंगेश आजबे, सुनील लोंढे, प्रहार संघटनेचे जयसिंग उगले, नईम भाई शेख, मनसेचे जिल्हाध्यक्ष वैभव जमकावळे, तालुकाध्यक्ष प्रदीप टापरे, उपाध्यक्ष सनी सदाफुले आदींनी आंदोलनास पाठिंबा दिला.
तहसीलदार विशाल नाईकवाडे, गटविकास अधिकारी परसराम कोकणी व पोलिस उपनिरीक्षक नीलेश कांबळे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
Edited By - Murlidhar Karale

