सोनई : पत्नी गौरी गडाख यांच्या निधनानंतर तिच्या आठवणीचा दिवा सतत तेवत राहण्यासाठी सोनईत तिच्या नावाने पुढील वर्षाच्या पाडव्याला अद्ययावत मोफत वाचनालय सुरु करण्यात येणार आहे, असा संकल्प यशवंत प्रतिष्ठाणचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी व्यक्त केला.
सोनईत आज गौरी गडाख यांचा दशक्रियाविधी झाला. महंत उध्दव मंडलिक महाराज, ओमशांती परिवाराच्या उषादिदी यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, उद्योजक विजय गडाख यांच्यासह परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. दशक्रियानिमित्त सेवा संस्थेचे अध्यक्ष विश्वास गडाख यांनी सदगुरु नारायणगिरी प्रबोधन प्रतिष्ठाणच्या वारकरी शिक्षणासाठी एक्कावन्न हजाराची देणगी दिली.
आपली भावना व्यक्त करताना प्रशांत गडाख म्हणाले, "झालेले दुःखं खुप मोठे असले, तरी सामाजिक बांधिलकीची नवनिर्मिती आत्मिक समाधान देते, अशी शिकवण जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी दिल्याने अद्ययावत वाचनालयाचा संकल्प केला आहे."
अस्थी नदीत नव्हे, झाडांना अर्पण
येथे साहित्यिक ग्रंथाबरोबरच, अध्यात्मिक व गरजुंना आवश्यक शालेय पुस्तके असणार आहे, असे त्यांनी सांगितले. नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी गौरी यांच्या अस्थी कौतुकी सुशोभीकरणातील झाडांना टाकण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.
दरम्यान, दहा दिवसांपूर्वी गाैरी गडाख यांनी गळफास घेऊन नगर येथील राहत्या घरी आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. ही घटना महाराष्ट्रात राज्यभर गाजली. गडाख कुटुंबिय राजकारणाबरोबर सामाजिक क्षेत्रात आघाडीवर आहे. त्यांनी गाैरी यांच्या स्मृती जागविताना भव्य वाचनालय सुरू करण्याचा संकल्प केला आहे.
Edited By - Murlidhar Karale

