नगर : पारनेमध्ये शिवसेनेतील पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर राज्यभर चर्चा झालेली असतानाच त्याच तालुक्यातील आमदारांच्या पत्नी अद्यापही शिवसेनेतच आहेत. जिल्हा परिषदेच्या सुपे गटाच्या जिल्हा परिषद सदस्या राणी लंके या शिवसेनेत असून, त्या राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या पत्नी आहेत. पक्षांतराच्या निमित्ताने या चर्चेलाही आता पाय फुटले आहेत.
पारनेर नगर पंचायतीच्या पाच नगरसेवकांनी दोन दिवसांपूर्वी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला. राज्यात महाआघाडी सरकारमध्ये हे दोन्ही पक्ष प्रमुख पक्ष म्हणून भूमिका बजावत आहेत. असे असताना एकमेकांतील नगरसेवक फोडणे योग्य नाही, यावरून राज्यातील वरिष्ठ नेत्यांमध्ये जोरदार चर्चा झडत आहेत. शिवसेनेचे नेते विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांचे हे नगरसेवक राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या आमदार निलेश लंके यांनी फोडले, अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली. तथापि, लंके यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना, संबंधित नगरसेवकांना राष्ट्रवादीत घेण्यात येत नव्हते, परंतु ते शिवसेना सोडून भाजपमध्ये जाणार होते, भाजपची ताकद वाढू नये, म्हणून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. औटी यांनीही प्रतिक्रिया देताना ते पाच नगरसेवक गेले म्हणून पक्षावर काहीही फरक पडणार नाही, असे सांगून हा विषय गांभिर्याने घेतला नाही.
वरील सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आमदार लंके यांच्या पत्नी राणी लंके या मात्र जिल्हापरिषदेच्या सदस्या असून, त्या शिवसेनेच्या सदस्या आहेत. वरील राज्यातील युतीसारखीच त्यांचीही काैटुंबिक युती असल्याची चर्चा सुरू झाली.
मग त्या शिवसेनेत कशा?
राज्य सरकारमध्ये दोन्ही पक्षाची युती असताना आमदार निलेश लंके अशा पद्धतीने फोडाफोडी करणार नाहीत. तसेच असते, तर त्यांच्या पत्नी शिवसेनेत राहिल्या नसत्या. आमदार लंके राष्ट्रवादीत असताना त्या शिवसेनेत कशा, अशा स्वरुपाची चर्चा पारनेर तालुक्यात होऊ लागली आहे.

