Success to MP Vikhe Patil's efforts! Onion, farm grants sanctioned | Sarkarnama

खासदार विखे पाटील यांच्या प्रयत्नाला यश ! कांदाचाळ, शेततळ्यांचे अनुदान मंजूर

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 2 जुलै 2020

हे प्रलंबित अनुदान मंजूर होण्यासाठी खासदार विखे पाटील यांनी विशेष पाठपुरावा केला. केंद्र सरकारकडे वारंवार अर्ज करून शेतकऱ्यांना अनुदान मिळवून दिल्याने कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांना त्याचा मोठा आधार होणार आहे.

नगर : दक्षिण नगर जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील शेतकऱ्यांचे केंद्र सरकारच्या योजनेतील कांदा चाळ व शेततळ्यांचे अनुदान मंजूर झाले आहे. केंद्र सरकारने पुरस्‍कृत केलेल्‍या राष्‍ट्रीय कृषि विकास योजनेेंतर्गत हे अनुदान थकले होते. कांदा चाळ उभारणीसाठी ४ कोटी ४१ लाख आणि वैयक्तिक शेततळे अस्‍तरीकरणासाठी ३ कोटी ४१ लाख रुपयांचे प्रलंबित असलेले अनुदान मंजूर झाले असल्याचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

हे प्रलंबित अनुदान मंजूर होण्यासाठी खासदार विखे पाटील यांनी विशेष पाठपुरावा केला. केंद्र सरकारकडे वारंवार अर्ज करून शेतकऱ्यांना अनुदान मिळवून दिल्याने कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांना त्याचा मोठा आधार होणार आहे.

याबाबत बोलताना डाॅ. विखे पाटील म्‍हणाले, की सध्या कोरोनामुळे शेतकऱी अडचणीत आहेत. त्यांचे प्रलंबित असलेले अनुदान मिळण्यासाठी आपण केंद्राकडे पाठपुरावा केला. केंद्र सरकारच्‍या माध्‍यमातून राबविण्‍यात येत असलेल्‍या राष्‍ट्रीय कृषि विकास योजनेच्‍या माध्‍यमातून कांदा उत्‍पादक शेतकऱ्यांना कांदा चाळ उभारणीसाठी अनुदान दिले जाते. कृषि विभागाच्‍या माध्‍यमातून याबाबत प्रस्‍ताव सादर केले जातात. या अनुदानासाठी शेतकरी वंचित राहिले होते. नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील आठ तालुक्‍यांमधुन सादर झालेल्‍या प्रस्‍तावांचा केंद्र सरकारकडे आणि कृषि विभागाकडे पाठपुरावा केल्‍यामुळे आजअखेर ५०७ शेतकऱ्यांना ४ कोटी ४१ लाख ३७ हजार ५०० रुपयांचे अनुदान मंजुर झाले आहे.

शेततळ्यांचे अनुदान मंजूर

राष्‍ट्रीय कृषि विकास योजनेच्‍या माध्‍यमातून सन २०१९-२० अंतर्गत वैयक्तिक शेततळे अस्‍तरीकरण योजनेसाठीही केंद्र सरकारने अनुदान मंजुर केले असून, यासाठी कृषि विभागाच्‍या माध्‍यमातून आत्‍तापर्यंत दाखल झालेल्‍या प्रस्‍तावांपैकी ४८४ शेतकऱ्यांच्या प्रस्‍तावाला मंजुरी मिळाली आहे. अनुदानापासुन वंचित राहिलेल्या या शेतकऱ्यांना एकुण ३ कोटी ४१ लाख १० हजार ३५१ रुपयांचे अनुदान मिळणार असल्‍याचे त्यांनी सांगितले.

या दोन्‍हीही योजनांबाबत कृषि विभागाकडे शेतकऱ्यांनी प्रस्‍ताव दाखल केलेल्‍या प्रस्‍तावालाही मंजुरी मिळावी, यासाठी आपला पाठपुरावा सुरू असून, उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकरच या योजनेतून प्रलंबित अनुदान मिळेल, असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. हे अनुदान मिळणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा आधार होणार आहे. कारण कोरोनामुळे सध्या शेतमालाला भाव मिळत नाही. शिवाय विक्रीची व्यवस्था होत नसल्याने शेतकऱ्यांनी या वर्षी भाजीपाला लागवड करण्याचे टाळले आहे. त्या पार्श्वभूमीवर मिळालेले प्रलंबित अनुदान मिळणार असल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना चांगला होणार आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख