नगर : भाजपनेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राहाता तालुक्यात काॅंग्रेसनेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत बंद यशस्वी झाला.
केंद्र सरकारने लादलेल्या अन्याय कारक कृषी व शेती कृषी व कामगार कायद्याला विरोध करून दिल्ली येथील शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राहाता तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.
महाराष्ट्रात शिवसेना, काॅंग्रेस व राष्ट्रवादी या तीन पक्षांचे महाआघाडी सरकार आहे. साहजिकच केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला या पक्षांनी शेतकऱ्यांना सहाय्य केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राहता येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. या वेळी झालेल्या केंद्र सरकारच्या विरुद्ध निषेध कार्यक्रमात सुरेश थोरात, इंद्रनाथ थोरात, श्रीकांत मापारी आदींनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
भाजपने दुकाने सुरू ठेवण्याचे अवाहन केले पण...
राहाता मतदारसंघांमध्ये भाजपच्यावतीने आज सर्व व्यापार व दुकाने सुरू ठेवण्यासाठी अवाहन केले होते, तथापि, येथील स्थानिक जनतेने केंद्र सरकारने लादलेल्या अन्यायकारक कामगार व कृषी कायद्याला विरोध दर्शवत आज भारत बंदला चांगला पाठिंबा दिला. बहुतेक व्यापारी शेतकरी उद्योजक या बंदमध्ये सहभागी झाले. एकमुखी महाविकास आघाडी सरकारच्या पाठीशी उभे राहिले.
सुरेश थोरात म्हणाले, की भाजीपाल्याचे अन्यायकारक कायदे लागले आहेत, त्यामुळे शेतकरी व कामगार उद्ध्वस्त होणार आहेत. हे कायदे तातडीने मागे घ्यावे, यासाठी काँग्रेस पक्षासह सर्व शेतकरी संघटना आक्रमक झाले आहेत. केंद्र सरकारने शेतकर्यांना सन्मानपूर्वक वागणूक देत कायदे मागे घ्यावेत, राज्यांमध्ये महाविकास आघाडी सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार असून, या सरकारने सातत्याने जनमानसाच्या विकासाची कामे केली आहेत. भाजपचे फसवे व जाहिरातबाजी लोक आहेत, त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहनही त्यांनी केले

