नगर : सत्तेची हाव चांगली नसते. ती डोक्यात घुसले की परतीचा प्रवास सुरू होतो. मी मात्र तसा नाही. अॅडजेस्टेबल पान्हा आहे. कुठेही फिट बसतो. मला कार्यकर्ते जोडण्याचा छंद आहे. मी चालताना रॅली अन थांबलो की सभा सुरू होते, असे पारनेरचे आमदार निलेश लंके विविध कार्यक्रमांतून सांगतात.
पारनेर तालुक्यात तसेच राहुरी तालुक्यात झालेल्या कार्यक्रमांत लंके यांनी आपल्या कामाची `स्टाईल` सांगितली. जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यात लंके यांचे चाहते आहेत, असे सांगताना लंके यांनी आपले यश हे केवळ कार्यकर्त्यांमुळे असल्याचे स्पष्ट केले. आमदार असलो, तरी इतर आमदारासारखे मी राहत नाही. सत्कार स्विकारणे तर बंद केले आहे. त्या ऐवजी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्याचे अवाहन केले आहे. त्यामुळे लोक देतात. कोणी लहान मुलांच्या चपला देतात, कुणी वह्या-पुस्तके देतात. जमा झालेले साहित्य मी गरीब विद्यार्थ्यांना वाटून टाकतो, असे लंके कार्यक्रमातून सांगतात. या व्यतिरिक्त फेसबूक लाईव्हच्या माध्यमातूनही त्यांनी युवकांशी संपर्क ठेवला आहे.
पण जुळावी शिवसेना - राष्ट्रवादीची नाळ
लंके यांनी आपल्या खास स्टाईलमुळे लोकप्रियता मिळविली आहे. मात्र शिवसेना व राष्ट्रवादीची नाळ मात्र तालुक्यात जुळून येत नाही. राज्यात महाविकास आघाडीत शिवसेना व राष्ट्रवादी हे दोन्ही मित्र पक्ष आहेत. पारनेरमध्ये मात्र या दोन्ही पक्षात विस्तव जात नाही, अशीच काहीशी स्थिती आहे. माजी आमदार विजय औटी यांच्या पराभवानंतर ही वैचारिक भिंत अधिक कडक होत गेली. लंके आमदार झाल्यानंतर हे दोन्ही नेते जुळवून घेतील का, असा प्रश्न दोन्ही कार्यकर्त्यांना पडत होता, तथापि, तसे झाले नाही. पारनेर नगर पंचायतीच्या राजकारणातही त्याचे प्रत्यंतर दिसून येत आहे. तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने या दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्र राज्यातील सरकारप्रमाणे एकत्र यावे, अशीच भावना दोन्ही कार्यकर्त्यांची आहे,राजकीय वर्चस्वाच्या लढाईत तसे मात्र होताना दिसत नाही.
या सर्व पार्श्वभूमीवर लंके यांनी मिळविलेली लोकप्रियता, जोडलेले कार्यकर्ते हे मात्र औटी यांच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरेल.

