निवडणूक प्रशिक्षणाला दांडी मारली? ही घ्या नोटीस!  - Strike training? Take this notice! | Politics Marathi News - Sarkarnama

निवडणूक प्रशिक्षणाला दांडी मारली? ही घ्या नोटीस! 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 11 जानेवारी 2021

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान यंत्रणा सज्ज झाली असून, मतदान अधिकारी व कर्मचारी यांना नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले. मतदानयंत्र हाताळण्यासाठी तहसील कार्यालयात ते उपलब्ध करून दिले आहे.

श्रीरामपूर : तालुक्‍यातील 27 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान अधिकारी आणि निवडणूक कर्मचारी यांना नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले. मतदान केंद्रावर प्रत्येकी एक मतदान केंद्राध्यक्ष, सहायक केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी पाच, तसेच एकेक शिपाई, असे एकूण 850 निवडणूक कर्मचारी नियुक्त केले आहेत. प्रथम टप्प्यातील प्रशिक्षणाला 15 केंद्राध्यक्ष, 27 सहायक केंद्राध्यक्ष, 50 मतदान अधिकारी, तसेच 31 शिपाई, अशा 123 जणांनी दांडी मारल्याने त्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. 

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान यंत्रणा सज्ज झाली असून, मतदान अधिकारी व कर्मचारी यांना नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले. मतदानयंत्र हाताळण्यासाठी तहसील कार्यालयात ते उपलब्ध करून दिले आहे. येत्या शुक्रवारी (ता. 15) तालुक्‍यातील 130 मतदान केंद्रांवर मतदान होत असून, त्यासाठी येथील खासदार गोविंदराव आदिक सांस्कृतिक सभागृहात प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. 

या वेळी तहसीलदार प्रशांत पाटील यांनी निवडणूक कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना केल्या. याप्रसंगी नायब तहसीलदार दीपक गोवर्धने, अशोक उगले यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र भगत, पुरुषोत्तम चौधरी, श्रीधर बेलसरे यांनी मार्गदर्शन केले. 

दरम्यान, बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत तालुक्‍यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असून, सुमारे 14 हजारांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. टाकळीभान, बेलापूर खुर्द, पढेगाव, निपाणी वडगाव, वडाळा महादेव परिसरात प्रचाराला वेग आला आहे. 

 

हेही वाचा...

बाभळेश्वर ग्रामपंचायतीत म्हस्के-विखेंच्या अस्मितेची लढाई 

 

कोल्हार : बाभळेश्वर (ता. राहाता) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विखे गट व म्हस्के गट परस्परांच्या विरोधात रिंगणात उतरल्यामुळे दोन्ही गटांनी या निवडणुकीत आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यामुळे येथे अस्मितेची लढाई सुरू आहे. 

गेल्या पंचवार्षिकमध्ये दोन्ही गटांत समझोता होऊन निवडणूक बिनविरोध झाली होती. या वेळीही तसेच होईल, असेच सर्वांना अपेक्षित होते. त्यादृष्टीने दोन्ही बाजूंनी हालचाली झाल्या. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून माघारीपर्यंत वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्नही करण्यात आले; परंतु ते निष्फळ झाले. बोलणी फिसकटली आणि निवडणूक लागली. ही ग्रामपंचायत राजकीयदृष्ट्या महत्त्वाची समजली जाते. 

आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळ व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते रावसाहेब म्हस्के यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी यांच्यात येथे सरळ लढत होत आहे. 17 सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीच्या सर्व जागांवर दोन्ही गटांनी तूल्यबळ उमेदवार उभे केले आहेत. महाविकास आघाडीचे 17पैकी 16 नवे चेहरे रिंगणात आहेत. त्यांपैकी विद्यमान सरपंच राजेंद्र म्हस्के तिसऱ्यांदा व त्यांच्या पत्नी माजी सरपंच लतिका म्हस्के दुसऱ्यांदा निवडणूक लढवीत आहेत. जनसेवा मंडळाचे प्रमोद बनसोडे हे एकमेव उमेदवार दुसऱ्यांदा निवडणूक लढवीत आहे. विशेषतः प्रभाग दोनमधील राजेंद्र म्हस्के विरुद्ध विखे गटाचे रवींद्र बेंद्रे, तसेच प्रभाग पाचमधील पंचायत समिती सदस्य बाबासाहेब म्हस्के यांच्या मातुःश्री विमल म्हस्के यांच्याविरुद्ध माजी सरपंच लतिका म्हस्के, प्रभाग चारमधील विखे पाटील गटाचे अमृत मोकाशी विरुद्ध महाविकास आघाडीचे गंगाधर बेंद्रे या लढती लक्षवेधी होणार आहेत. 

बिनविरोध झालेल्या गेल्या पंचवार्षिकमध्ये म्हस्के गटाला दहा व विखे गटाला सात जागांचे वाटप करण्यात आले होते. एका पंचवार्षिकचा अपवाद वगळता बाभळेश्वर ग्रामपंचायतीची सत्ता सलग म्हस्के यांच्या ताब्यात आहे आणि सात पंचवार्षिक सरपंचपद रावसाहेब म्हस्के घराण्याकडे आहे. महाविकास आघाडीने निवडणूक प्रचारात प्रामुख्याने आपल्या कार्यकाळात केलेल्या 

लोकाभिमुख कारभाराचा, तसेच गटातटाचा विचार न करता केलेल्या विकासाचा मुद्दा मतदारांपुढे नेला आहे. जनसेवा मंडळाच्या उमेदवारांकडून, ग्रामपंचायतीने फक्त चौदाव्या वित्त आयोगातून विकासकामे केली; परंतु राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आमदार निधीतून, तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून गावासाठी विकासनिधी मिळवून दिल्याचा मुद्दा मतदारांना पटवून दिला जात आहे. मतदानाला अवघे चार दिवस उरले असताना, ही निवडणूक चुरशीची होत चालली आहे. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख