पारनेर : वाघुंडे येथील बलात्काराच्या घटनेतील आरोपींनी पिडीतेवर हल्ला केला असल्याच्या प्रकरणातील आरोपींना जामिन किंवा पॅरॉलवर सोडताना न्यायालयाने घालून दिलेल्या निर्बंधांची काटोकोरपणे अंमलबजावणी करावी व पोलिसांकडून कठोर कारवाई व्हावी, यासाठी शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉ. निलम गोऱ्हे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र पाठवून कळविले आहे.
पत्रात आमदार गोऱ्हे यांनी म्हटले, की नगर जिल्ह्यात अत्याचाराच्या वारंवार घटना घडत आहेत. वाघुंडे येथे मार्च 2020 मध्ये एका महिलेवर बलात्कार झाला होता. त्यातील आरोपींना अटक होऊन जामिनही मिळाला होता. त्या आरोपींनी पिडीतेस बलात्काराची केस मागे घे, असे म्हणत तिच्या 10 वर्षाच्या मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना गुरूवारी (ता. 13 ) रोजी घडली आहे. ही छोटी मुलगी 15 टक्के भाजली आहे.
पिडीतेच्या तक्रारीवरून राजाराम तरटे व अमोल तरटे (दोघेही रा. पळवे) यांच्या विरोधात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. यातील राजाराम तरटे या आरोपीस अटक करण्यात आली आहे. मात्र कोविड -19 मुळे तुरूंगातील आरोपींना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बलात्कार व लैंगिक छळातील आरोपींना जामीन मिळत आहेत. जामिन मिळाला, तरी त्यांच्यावर निर्बंध घातले आहेत, मात्र त्या निर्बंधांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच त्यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे की, पिडीत महिला व तिच्या कुटुंबास पोलीस संरक्षण देण्यात यावे. तसेच अटक केलेल्या आरोपीस जामिन देण्याचा निर्णय झाला, तर पिडीतेच्या जिविताला धोका आहे. त्यासाठी आरोपीचा जामिन रद्द करण्याची न्यायालयास विनंती करावी.
बलात्कार तसेच बाललैंगिक आत्याचाराच्या घटनेतील आरोपींना जामिनावर किंवा पॅरॉलवर सोडताना विविध निर्बंध न्यायालयाकडून घालून देण्यात आले आहेत. मात्र त्याची कोटोकोरपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही त्या नियमांची कोटोकोरपणे अंमलबजावणी व्हावी या साठी तसे आदेश आपण स्थानिक पोलीस प्रशासनास द्यावेत असेही आमदार गो-हे यांनी गृहमंत्री देशमुख यांना पाठविलेल्या पत्रात शेवटी म्हटले आहे.
Edited By - Murlidhar Karale

