चांद्यात गडाख-मुरकुटेंत सरळ लढत - Straight fight in Gadakh-Murkuten in the silver | Politics Marathi News - Sarkarnama

चांद्यात गडाख-मुरकुटेंत सरळ लढत

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 11 जानेवारी 2021

सत्ताधारी गटाने विद्यमान सदस्यांपैकी दोन जणांना उमेदवारी देऊन, पंधरा नवे चेहरे उभे केले आहेत, तर विरोधी गटप्रमुख वगळता सर्व सोळा उमेदवार नवे आहेत. 

सोनई : चांदे (ता. नेवासे) ग्रामपंचायत निवडणुकीत आजी-माजी आमदार गटांत असलेली सरळ लढत रंगात आली आहे. चांद्यात कोण बाजी मारणार आणि कुणाचे वांधे होणार, याकडे तालुक्‍याचे लक्ष लागले आहे. 

जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख गटाचे नेतृत्व माजी पंचायत समिती सभापती कारभारी जावळे, "मुळा'चे संचालक बाबूराव चौधरी, मराठा महासंघाचे संभाजी दहातोंडे व अनिल अडसुरे करीत आहेत, तर माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे गटाचे नेतृत्व कैलास दहातोंडे करीत आहेत. सहा प्रभागांतून सतरा उमेदवार निवडून द्यायचे आहेत. 

मराठा महासंघाच्या दहातोंडेंची घरवापसी गडाख गटासाठी फायद्याची ठरेल, असे चित्र आहे. मिरी रस्ता, पुंडवाडी, साधक आश्रम परिसर, शिवाजी चौक, पेठ परिसर, शास्त्रीनगर, लोहारवाडी रस्ता आणि संपूर्ण गावात दोन्ही गटांनी प्रचाराची दुसरी फेरी पूर्ण केली आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात दोन्ही गटांत गठ्ठा मतदान मिळविण्यासाठी स्पर्धा लागली आहे. 

सत्ताधारी गटाने विद्यमान सदस्यांपैकी दोन जणांना उमेदवारी देऊन, पंधरा नवे चेहरे उभे केले आहेत, तर विरोधी गटप्रमुख वगळता सर्व सोळा उमेदवार नवे आहेत. या गावात निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात नेहमीच जातीय समीकरण जुळवत राजकारण केले जाते. 

 

हेही वाचा..

उमेदवारांसमोरच होतात मतदानयंत्रे "सील' 

नगर तालुका  : तालुक्‍यातील 56 ग्रामपंचायतींमधील एक हजार 172 उमेदवारांतून 497 सदस्यांच्या निवडीसाठी शुक्रवारी (ता. 15) मतदान होणार आहे. त्याची तयारी तालुका प्रशासनाच्या वतीने पाइपलाइन रस्त्याशेजारील डॉ. नाथ जयवंत पाऊलबुद्धे विद्यालयात सुरू करण्यात आली आहे. मतदानयंत्रांचे सीलिंग व मतदान अधिकाऱ्यांना मतदानयंत्रे हाताळण्याचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. 

नगर तालुक्‍यातील 59 पैकी तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, उर्वरित 56 ग्रामपंचायतींच्या मतदानाची तयारी तालुका निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार उमेश पाटील, नायब तहसीलदार अभिजित बारवकर यांनी सुरू केली आहे. चार दिवसांत पाऊलबुद्धे विद्यालयात इलेक्‍ट्रॉनिक्‍स मतदानयंत्रे "सील' करण्याची प्रक्रिया चार भागांत सुरू करण्यात आली आहे. या वेळी उमेदवार व त्यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. त्यांच्यासमोरच मतदानयंत्राची सीलिंग प्रक्रिया सुरू करण्यात आली. 

नगर तालुक्‍यातील 56 ग्रामपंचायतींचे तालुक्‍यात 199 प्रभाग असून, त्यासाठी 219 मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेसाठी सुमारे दीड हजार कर्मचाऱ्यांची 276 पथके निवडण्यात आली असून, प्रत्येक पथकात पाच जण कार्यरत राहतील. त्यांना दोन टप्प्यांत तोंडी प्रशिक्षण देण्यात आले. सलग चार दिवस त्यांना प्रत्यक्ष मतदानयंत्रे हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. रोज 70 पथकांमधील 300 मतदान कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे, अशी माहिती तहसीलदार पाटील यांनी दिली. दरम्यान, महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी प्रशिक्षण सुरूच आहे.
 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख