कहाणी आमदार मुलाच्या कामदार आईची ! - The story of MLA's son's working mother! | Politics Marathi News - Sarkarnama

कहाणी आमदार मुलाच्या कामदार आईची !

निलेश दिवटे
रविवार, 11 ऑक्टोबर 2020

आपल्या सामाजिक कामात कायम व्यस्त असणाऱ्या आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार सध्या कर्जत-जामखेडच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सर्वांच्या एकजुटीने काम करीत आहेत.

कर्जत : आपल्या सामाजिक कामात कायम व्यस्त असणाऱ्या आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार सध्या कर्जत-जामखेडच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सर्वांच्या एकजुटीने काम करीत आहेत. त्यांचे स्वच्छ सर्वेक्षण अभियानातील काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. पडद्याआड असलेली आमदार मुलाची कामदार आई सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

रोहित सुनंदा राजेंद्र पवार असा आपल्या नावाचा उल्लेख करून आमदारांच्या शपथविधीत आमदार रोहित पवार यांनी अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधले होते. आपल्या आईच्या नावाचा उल्लेख करून व्यक्त केलेली कृतज्ञता सुनंदा पवार यांच्या कार्यापुढे आज तोकडी ठरताना दिसते. आमदार पवार सध्या मतदारसंघाच्या विकासासाठी करीत असलेल्या प्रयत्नांना उभारी देण्यासाठी बारामती ऍग्री कल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार या देखील अनेक उपक्रमातून आमदार मुलाच्या खांद्याला खांदा लावून सामाजिक कार्यातून विविध व्यवसाय व महिलांच्या प्रश्नांसाठी झटत आहेत. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत मतदारसंघाचे नाव उंचावण्यासाठी सुनंदा पवार स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभागी झाल्या आहेत.

कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात स्वतःपासून व्हावी, हा मूलमंत्र देणाऱ्या आमदार माता सुनंदा पवार यांनी स्थानिक पातळीवर उतरून स्वच्छतेची सुरुवात करीत आहेत. गवत, काट्यात हात घालून परिसराची स्वच्छ करण्याची त्यांची ही जिद्द अनेक सामाजिक संस्था व नागरिकांना आपल्या जबाबदारीचे दर्शन घडवणारी आहे. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत आपल्या तालुक्याचा प्रथम क्रमांक कसा येईल? याबाबत आता जागरूकता निर्माण झाली आहे. 'आधी करावे मग सांगावे' या वचनाचे पालन करीत आता सर्वच राजकीय पदाधिकारी,शासकीय अधिकारी, नगरपंचायत, रोटरी क्लब, हरित अभियान, बीजेएस,आजी माजी सैनिक संघटना,एन. एस. एस, एन. सी. सी, पत्रकार संघटना, सामाजिक संघटना, विद्यार्थी,ग्रामस्थ या स्वच्छ सर्वेक्षण चळवळीत झोकून देऊन काम करीत आहेत.विविध कल्पना सत्यात उतरवून आगळे-वेगळे उपक्रमही राबवले जात आहेत.
 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख