Stone throwing and free style on the police from the water | Sarkarnama

पोलिसांवरच दगडफेक ! पण ते म्हणतात असे काही झालेच नाही

संजय आ. काटे
शनिवार, 9 मे 2020

वितरीका बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिस व घोडच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर मोठी दगडफेक झाली. तेथील वाहनांचे यात नुकसान झाले.

श्रीगोंदे : घोड कालव्याचे वितरीका क्रमांक ११ मधून बेकायदेशिररित्या पाणी घेतल्याप्रकरणी शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल झाला. नंतर ही वितरीका बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिस व घोडच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर मोठी दगडफेक झाली. तेथील वाहनांचे यात नुकसान झाले. काही लोकांची पोलिसांशी फ्रि-स्टाईलही झाली. हे सगळे झाले याला घोडचे अधिकारी होकार देत असताना पोलिस अधिकारी मात्र असे काही झालेच नसल्याचे सांगत मूळ घटनेपासून पळ काढत आहेत.
घोड धरणातून सुरु असणाऱ्या उन्हाळी आवर्तनात चिंभळे हद्दीतील ११ क्रमांकाची वितरिका काही शेतकऱ्यांनी बळजबरीने खोलून पाणी घेतले. याप्रकरणी घोडच्या अधिकाऱ्यांनी बेलवंडी पोलिसात फिर्याद दिली. गुरुवारी सांयकाळी उशिरा सुरु असणारे पाणी बंद करण्यासाठी घोडचे अधिकारी, कर्मचारी व पोलिसांचा फौजफाटा तेथे गेला. मात्र तेथे शेतकऱ्यांशी बाचाबाची सुरु झाली. त्यातून काही लोकांनी मोठ्या प्रमाणात दगडफेक सुरु केली. काही दगड पोलिसांना लागले. जेसीबी यंत्रासह इतर वाहनांवर दगड पडले. पोलिसांवर हल्ला झाला, तरी  याबद्दल पोलिसांनी कुठलाही गुन्हा नोंदला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 
दरम्यान, बेलवंडीचे पोलिस निरीक्षक अरविंद माने यांनी, असे काही घडलेच नाही. दगडफेक झाली नसून कुणीही पोलिसांना हातही लावला नसल्याचा दावा त्यांनी केला.

पोलिसांनाही प्रसाद मिळाला : पंधरकर
याच प्रकरणाचे साक्षीदार असणारे घोडचे शाखा अभियंता भाऊसाहेब पंधरकर यांनी मात्र हे सगळे घडल्याचे सांगितले. पाऊस पडावा तसे दगड भिरकत होते. यात पोलिसांना प्रसाद मिळाला. काही लोकांशी झटापट झाल्याने एका पोलिसाचा शर्टही फाटला. पाणी बंद करण्यासाठी आणलेले जेसीबी यंत्राच्या काचा फुटल्या. पोलिसांनी त्यांच्या ताब्यात घेतलेले वनविभागाच्या वाहनावर दगड पडले. याविषयी पोलिस का लपवितात याची आपणाला कल्पना नसल्याचे ते म्हणाले.

माहिती लपविणे ही बाब गंभीर : सातव
याबाबत आपण माहिती घेवू. पोलिसांवर दगडफेक होवून अधिकारी जर ते लपवित असतील, तर गंभीर बाब आहे. वस्तुस्थितीची माहिती घेवून वरिष्ठांना याबाबत कळवू, असे कर्जतचे पोलिस उपअधीक्षक संजय सातव यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांपर्य़ंत तक्रार देणार

दरम्यान, घोडच्या पाण्याच्या या प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात यावी. तसेच पोलिस अधिकारी माहिती लपवून प्रकरण दडपवून टाकत असतील, तर त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख