Stolen or sold chicken water? | Sarkarnama

"कुकडी'चे पाणी चोरले की विकले?

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 5 जून 2020

एकंदरीत येडगाव ते कर्जत हद्दीपर्यंत 1200 दशलक्ष घनफूट, म्हणजे सुमारे सव्वा टीएमसी पाण्याचा अपव्यय होतो. हा अपव्यय श्रीगोंद्याच्या माथी मारला जातो. हे पाणी नेमके कुठे मुरते, याची चौकशी व्हायला हवी.

श्रीगोंदे : "कुकडी' डाव्या कालव्याचे उन्हाळी हंगामातील मार्चमध्ये सुरू झालेले आवर्तन 42 दिवस चालले. त्यात येडगावपासून 165 किलोमीटरपर्यंत सव्वा टीएमसी पाण्याचा अपव्यय झाला. हे पाणी कुणी चोरले की विकले, याचा हिशेब जलसंपदा विभागाने द्यावा, अशी मागणी कुकडी कालवा कृतिसमितीचे निमंत्रक प्रा. तुकाराम दरेकर यांनी केली आहे. 

प्रा. दरेकर म्हणाले, ""कुकडी'च्या डाव्या कालव्यातून सोडलेले पाणी श्रीगोंद्याची हद्द जेथे सुरू होते, त्या 110व्या किलोमीटरला फक्त 950 क्‍यूसेकने मिळते. म्हणजे, गेल्या आवर्तनात रोज 132 क्‍यूसेकप्रमाणे 42 दिवसांत 5544 क्‍यूसेक, म्हणजे 480 दशलक्ष घनफूट पाणी गायब झाले. याचा उघड उघड अर्थ असा, की हे पाणी येडगाव ते श्रीगोंदेदरम्यान 110 किलोमीटरपर्यंत कोणीतरी वापरले. जलसंपदा विभागाने ते का वापरू दिले?'' 

श्रीगोंद्याची हद्द सुरू होणाऱ्या ठिकाणी जर 1082 क्‍यूसेकने पाणी मिळाले असते, तर 165 किलोमीटरला त्यातून 220 क्‍यूसेक अपव्यय वजा जाता, कर्जत तालुका हद्दीवर हे पाणी 860 क्‍यूसेकने मिळायला हवे होते. परंतु, कर्जत हद्दीपासून हा कालवा 650 क्‍यूसेकने चालतो. म्हणजे 110 ते 165 किलोमीटरमध्ये रोज 210 क्‍यूसेकप्रमाणे 42 दिवसांत 8820 क्‍यूसेक म्हणजेच 762 दशलक्ष घनफूट पाण्याचा अपव्यय होतो, असे प्रा. दरेकर यांनी म्हटले आहे. 

एकंदरीत येडगाव ते कर्जत हद्दीपर्यंत 1200 दशलक्ष घनफूट, म्हणजे सुमारे सव्वा टीएमसी पाण्याचा अपव्यय होतो. हा अपव्यय श्रीगोंद्याच्या माथी मारला जातो. हे पाणी नेमके कुठे मुरते, याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी दरेकर यांनी केली आहे. 

दरम्यान, कुकडीच्या पाण्यावरून गेल्या पंधरा दिवसांपासून वादंग सुरू आहे. आमदार बबनराव पाचपुते, आमदार रोहित पवार, माजीमंत्री प्रा. राम शिंदे या नेत्यांमध्ये हा वाद धुमसतो आहे. पाण्याचे श्रेय कोणाचे, हे मुख्य कारण असले, तरी शेतकऱ्यांना तातडीने पाणी मिळणे आवश्यक असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे.

जलसंपदामंत्र्यांचीही दिशाभूल 

प्रा. दरेकर म्हणाले, ""मार्च-एप्रिलच्या आवर्तनात श्रीगोंद्याला फक्त 664 दशलक्ष घनफूट पाणी मिळाले. मात्र, कागदोपत्री 1100 दशलक्ष घनफूट पाणी दिल्याचे अहवाल जलसंपदा विभागाने जलसंपदामंत्र्यांना दिला आहे. त्यात मंत्र्यांचीही दिशाभूल केली आहे. त्यामुळे या सव्वा टीएमसी पाण्याचा हिशेब सर्वपक्षीय नेत्यांनी मागावा.'' 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख