भाजपच्या राज्य कार्यकारिणीत प्रा. राम शिंदे यांना उपाध्यक्षपद - In the state BJP executive committee, Pvt. Vice President to Ram Shinde | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपच्या राज्य कार्यकारिणीत प्रा. राम शिंदे यांना उपाध्यक्षपद

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 3 जुलै 2020

भारतीय जनता पक्षाची प्रदेश कार्यकारिणी आज प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केली. प्रदेश उपाध्यक्षपदी माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांची निवड झाली आहे. तसेच कार्यकारिणीत मंत्री म्हणून स्नेहलता कोल्हे यांना स्थान देण्यात आले आहे.

नगर : भारतीय जनता पक्षाने आज जाहीर केलेल्या कार्यकारिणीत उत्तर नगर जिल्ह्याला झुकते माप दिले आहे. उत्तरेतील सहा नेत्यांना स्थान दिले असून, दक्षिणेतील केवळ दोनच नेत्यांचा समावेश केला आहे. त्यामुळे दक्षिण नगर जिल्ह्यातून नाराजीचा सूर आहे. या कार्यकारिणीत जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना उपाध्यक्षपद दिले आहे.

भारतीय जनता पक्षाची प्रदेश कार्यकारिणी आज प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केली. प्रदेश उपाध्यक्षपदी माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांची निवड झाली आहे. तसेच कार्यकारिणीत मंत्री म्हणून स्नेहलता कोल्हे यांना स्थान देण्यात आले आहे. प्रदेश कार्यसमिती सदस्यपदी भानुदास बेरड, प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्यपदी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, वैभव पिचड, चंद्रशेखर कदम यांना संधी देण्यात आली आहे. प्रदेश कार्यसमिती विशेष निमंत्रित सदस्यपदी आमदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री मधुकर पिचड यांना स्थान देण्यात आले आहे. या निमित्ताने उत्तरेला झुकते माप मिळाले आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू

प्रा. शिंदे हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जातात. नगरमध्ये भाजपच्या राजकारणात शिंदे यांचे मानाचे स्थान आहे. तथापि, मागील विधानसभा निवडणुकीत त्यांना पवार कुटुंबियांकडून पराभवाचा सामना करावा लागला. पराभवाला खचून न जाता त्यांनी पक्षाचे काम सुरूच ठेवले आहे. आगामी काळात पक्षवाढीची जबाबदारी त्यांच्यावर येवू शकते. कर्जत-जामखेडमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याशी सामना करताना प्रा. शिंदे यांना हे पद मिळाल्याने त्यांच्या समर्थकांमधून समाधानाचे वातावरण आहे.

दक्षिणेतून केवळ राम शिंदे

दरम्यान, भाजपने दक्षिण नगर जिल्ह्यातून केवळ प्रा. शिंदे यांनाच संधी दिली आहे. उत्तरेत मात्र अनेकांना संधी मिळाली आहे. दक्षिण नगर जिल्ह्यात पक्षसंघटना बांधणीची जबाबदारी त्यामुळे शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे पडली आहे. हे राज्याचे उपाध्यक्षपद असले, तरी स्थानिक पातळीवर खिळखिळी झालेल्या संघटनेला उर्जितावस्था आणण्याची जबाबदारी शिंदे यांच्यावर आल्याचे मानले जाते. असे असले, तरी भाजपचे दक्षिणेतील कार्यकर्ते मात्र नाराज आहेत. दक्षिणेतून इतर नेत्यांनाही संधी मिळायला हवी होती, असे कार्यकर्त्यांचे मत आहे. दक्षिणेत खासदार डाॅ. सुजय विखे पाटील हे भाजपचे आहेत. त्यामुळे विखे व शिंदे कशा पद्धतीने मोट आवळतात, हे आगामी काळात दिसून येणार आहे.

 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख