Standing in line for alcohol, he did not get food | Sarkarnama

दारूच्या रांगेत उभे राहिले अन मोफतच्या अन्नाला मुकले 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 7 मे 2020

सामान्य कुटुंबातील मोलमजुरी करणारे युवक 100 ते 150 रुपये देऊन रांगेत उभे करण्यात आले होते. या रांगेचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर "व्हायरल' झाल्याने अनेकांची ओळख समोर आली. आणि ते मोफत अन्नाला मुकले. 

संगमनेर : दारूच्या दुकानासमोर रांगेत उभे राहिलेल्या सुमारे शंभर जणांना स्वयंसेवी संस्थांकडून मिळणारे मोफत जेवणाचे डबे बंद झाले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संकटात दारूमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. 
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने तब्बल दीड महिन्यानंतर मंगळवारी (ता. 5) दारूची दुकाने उघडली. शहरातील दुकानांसमोर पहाटेपासून मद्यप्रेमींच्या रांगा लागल्या होत्या. मद्यशौकीन असूनही सामाजिक स्थानामुळे अनेकांनी दारूखरेदीसाठी युवकांचा आधार घेतला. सामान्य कुटुंबातील मोलमजुरी करणारे युवक 100 ते 150 रुपये देऊन रांगेत उभे करण्यात आले होते. या रांगेचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर "व्हायरल' झाल्याने अनेकांची ओळख समोर आली. 
रांगेतील अनेकांना लॉकडाउनच्या काळात शहरातील स्वयंसेवी संस्थांकडून जेवणाचे डबे मिळत होते. दारू विकत घेण्यासाठी पैसे असताना, त्यांना मोफत अन्न देण्यावरून संताप व्यक्त झाला. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आदींसह अन्य संस्थांनी अन्नदान सुरू केले होते. गरजूंना सुमारे 800 डब्यांचे मोफत वितरण करण्यात येत होते. मात्र, दारूच्या रांगेत उभे राहणाऱ्या 100 लाभार्थींचे डबे बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती बजरंग दलाचे जिल्हा सहसंयोजक कुलदीप ठाकूर यांनी दिली. शे-दीडशे रुपयांच्या मोहापायी धनदांडग्यांच्या आमिषाला बळी पडून मोफतच्या अन्नाला मोताद होण्याची वेळ अनेकांवर आली आहे. 

हेही वाचा...

शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत 
नगर : महावितरणकडून महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित झाल्याने शहराचा पाणी पुरवठा पुन्हा विस्कळीत झाला आहे. बुधवार ( ता. 6) सायंकाळी 7.55 वाजता वीज वितरण कंपनीच्या एमआयडीसीतील ट्रान्सफॉर्मर नादुरूस्त झाल्याने बहुुतांश भागाचा पाणी पुरवठा बंद होता. आज सायंकाळी 4 वाजता पुन्हा ट्रान्सफार्मर नादुरूस्त झाला. त्यामुळे मुळानगर पंपिंग स्टेशन येथून होणारा पाणी उपसा बंद पडला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यानंतर सायंकाळी 7.12 वाजता पुरवठा सुरू झाला. मात्र, पाणी उपसा पूर्ववत होण्यास तीन ते चार तासाचा अवधी लागणार आहे. परिणामी उद्या (ता. 8) शहराच्या मध्यवर्ती भागास पाणी पुरवठा उशिरा व कमी दाबाने होणार आहे. शनिवारी (ता. 9) रोटेशननुसार पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख