माघार घेतलेल्या हंगेतील इच्छुकांचे आमदार लंके राजकीय पुनर्वसन करणार - Sri Lanka will rehabilitate the aspiring MLAs in Hungary | Politics Marathi News - Sarkarnama

माघार घेतलेल्या हंगेतील इच्छुकांचे आमदार लंके राजकीय पुनर्वसन करणार

मार्तंड बुचुडे
बुधवार, 6 जानेवारी 2021

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचे श्रेय सर्व ग्रामस्थांचे आहे, माझे नाही. सर्वांनी राग-लोभ विसरून एकत्र येत मतभेदांना तिलांजली दिल्याने आता हंगे एक परिवार म्हणून ओळखले जाईल.

पारनेर : गेल्या अनेक वर्षांचा राजकीय विरोध झुगारून मनाचा मोठेपणा दाखवित विरोधकांनी माझ्यावर विश्वास टाकत हंगे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केली. यापुढे हंगे एक परिवार असेल. माघार घेणाऱ्या विरोधकांचे राजकीय पुनर्वसन करण्याची जबाबदारी माझी आहे. मी दिलेला शब्द पाळणारा माणूस असल्याने आज आमदार आहे, असे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले. 

हंगे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर गावात विजयी सभा झाली. त्यावेळी लंके बोलत होते. ते म्हणाले, ""ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचे श्रेय सर्व ग्रामस्थांचे आहे, माझे नाही. सर्वांनी राग-लोभ विसरून एकत्र येत मतभेदांना तिलांजली दिल्याने आता हंगे एक परिवार म्हणून ओळखले जाईल.'' 

बिनविरोध निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतीला विकासासाठी 25 लाखांचा निधी देण्याची घोषणा लंके यांनी केली होती. काही गावांतून त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, लंके यांचे स्वत:च्याच हंगे येथे काही पारंपरिक विरोधकांनी अर्ज दाखल केल्याने गावची निवडणूक बिनविरोध होणार का, याची उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, शेवटी विरोधकांनी माघार घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली. त्याबद्दल लंके यांनी ग्रामस्थांसह विरोधकांचे विशेष आभार मानले. 

ग्रामपंचायत निवडणुकीत संघर्ष व्हायचा. अटीतटीच्या लढती होत. मात्र, सुमारे 15 वर्षांच्या संघर्षानंतर आज आपण एका व्यासपीठावर आलो. हंगे गावच्या इतिहासात हा सुवर्णाक्षरांनी लिहिण्याजोगा प्रसंग असल्याचे लंके म्हणाले. 

गावातील भांडण आता पोलिसांत जाणार नाही. गावातील वाद गावातच मिटवू. आपण राजकीय स्वार्थासाठी एकत्र आलेलो नाही. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णयही राजकीय कारणांसाठी घेतलेला नाही. त्यातून कटूता दूर करण्याचे मोठे काम झाले, असे लंके म्हणाले. 

दरम्यान, लंके यांचे गाव असलेल्या हंगे या गावाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. इतर गावांना बिनविरोधचा नारा दिल्याने ते स्वतःचेच गाव बिनविरोध करू शकतात का, याबाबत उत्सुकता होती.

बिनविरोध उमेदवार ः राजेंद्र दळवी, वनीता शिंदे, नीता रासकर, जगदीप साठे, सविता नगरे, रुपाली दळवी, सुलोचना लोंढे, राजेंद्र शिंदे, बाळासाहेब दळवी, मेघा नगरे व माया साळवे. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख