संगमनेर : राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा मतदारसंघ म्हणून संगमनेरची राज्यात ओळख आहे. येथील एक चर्चही राज्यात नामानिराळे ठरले आहे. तेथील तैलचत्र तब्बल 118 वर्षांपूर्वीचे आहे. ते आजही त्याच स्थितीत आहेत. त्याला कोणता रंग वापरला असेल, हेच इतिहासप्रेमींपुढे कोडे बनले आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात ख्रिस्ती धर्मप्रसारासाठी 1888 साली नगर जिल्ह्यात आलेल्या मिशनऱ्यांनी स्थापन केलेल्या प्रमुख धर्मग्रामापैकी संगमनेर व अकोले तालुक्यासाठी महत्वाचे समजले जाणारे सेंट मेरी चर्च संगमनेरात आहे. या चर्चच्या अंतर्भागात सजावट व धर्मप्रसाराच्या हेतूने लावलेली 14 अप्रतिम तैलचित्रे 1902 सालातील म्हणजे सुमारे 118 वर्षांपूर्वीची आहेत.
संगमनेर खुर्दमधून जोर्वे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या सेंट मेरी चर्चला स्थानिक लोक फादरवाडी म्हणून ओळखतात. पाच एकर शेतजमिनीत घेतलेल्या उत्पन्नावर चर्च व कॉन्व्हेंट संस्थेचा कारभार चालवण्याची वहिवाट आहे. फादर वाईस हॉप्ट भारतात आल्यानंतर धर्मप्रसारासह रंजल्या गांजल्यांसाठी विविध पातळीवर कार्य करुन त्यांना दिलासा दिला. त्या काळातील प्रवासाच्या अडचणींवर मात करीत संगमनेरात 28 जुलै 1892 या वर्षी सेंट मेरी धर्मग्रामाची स्थापना झाली. या धर्मग्रामांतर्गत दोन तालुक्यातील 60 पेक्षा अधीक खेडी व मिस्सा केंद्र आहेत. या ठिकाणी पुढील काळात शाळा, मुला मुलांचे स्वतंत्र वसतीगृह उभे राहिले. फादर गेरार्ड किप यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी धर्मप्रसार व प्रार्थनेसाठी डिसेंबर 1897 मध्ये दगडी बांधकाम असलेली चर्चची भव्य व देखणी वास्तू उभी राहिली. धन्य कुमारी मारियेच्या निष्कलंक गर्भसंभवाचे मंदिर असे त्याचे पूर्वी नाव होते.
धर्मप्रसार व वास्तूच्या सजावटीसाठी युरोपातील तत्कालीन चित्रकाराने 1902 साली रेखाटलेली, सागवानी फ्रेमची चार फुट बाय तीन फुट या आकाराची क्रुसाची वाट ही 14 तैलचित्रे चर्चच्या अंतर्भागात लावलेली आहेत. येशुच्या शेवटच्या दिवसांची कथा स्पष्ट करणाऱ्या प्रसंगातून त्यातील पात्रांचे विविध भाव, येशुचे कारुण्य, अनुयायांचे रुदन यातून बघायला मिळते. याच प्रकारची तैलचित्रे पुणे येथील सेंट फ्रान्सिस झेवियर चर्चमध्ये बघायला मिळतात. मध्यंतरी या चित्रांच्या पार्श्वभुमिला कोणीतरी सोनेरी रंग मारल्याने मुळ चित्र लोपले असले, तरी 118 वर्षानंतरही त्याचे रंग टिकून आहेत. कलाअभ्यासकांना ही चित्रे म्हणजे मेजवानी आहेत.
स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षण व भाषेच्या अडचणीमुळे तत्कालिन देशी अनुयायांना चित्रातून ख्रिस्ती धर्म अधिक चांगल्या पध्दतीने सांगता आला असावा. त्यामुळे या चित्रांना मोठे महत्व आहे. संगमनेर वगळता नगर जिल्ह्यातील अन्य चर्चमध्ये कुठेही इतकी प्राचिन चित्रे असल्याचे संभवत नाही, असे सेंट मेरी चर्चचे धर्मग्राम प्रमुख फादर सायमन शिनगारे यांनी सांगतले.
Edited By - Murlidhar Karale

