Something went wrong with the Centre's trade strategy on Chinese products | Sarkarnama

चिनच्या उत्पादनाविषयी केंद्राच्या व्यापारविषयक रणनितीत कुठेतरी चूक

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 9 जून 2020

स्मार्ट फोनपासून तर घरगुती व इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांपर्यंत अनेक क्षेत्रांत आज चिनी उत्पादनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. किंबहुना बाजारातील सुमारे 65 ते 70 टक्के हिस्सा या चिनी उत्पादनांनीच काबीज केला आहे.

जामखेड : केंद्र सरकारकडून मागील पाच वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली 'मेक इन इंडिया' कार्यक्रम राबवला जात असतानाही चिनी उत्पादने ही अशा प्रकारे भारतीय बाजारपेठ काबीज करत असतील, तर आपल्या व्यापारविषयक रणनितीत कुठेतरी गंभीर चूक झाली, असे सांगून चीनच्या निर्यातीला लगाम लावू शकतो, याचा राज्यातील व देशातील उद्योजक व युवकांनी जरुर विचार करावा, असे ट्विट आमदार रोहित पवार यांनी करून सरकारला काही महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत.

स्मार्ट फोनपासून तर घरगुती व इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांपर्यंत अनेक क्षेत्रांत आज चिनी उत्पादनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. किंबहुना बाजारातील सुमारे 65 ते 70 टक्के हिस्सा या चिनी उत्पादनांनीच काबीज केला आहे. असे म्हणले तरी ते ती अतिशयोक्ती ठरणार नाही. साधारणपणे 2014 नंतर आजपर्यंतचा विचार केला, तर चीनची भारतात होणारी निर्यात ही सुमारे 15-20 टक्क्यांनी वाढली आहे. देशातील स्मार्टफोनची बाजारपेठ चीननेच काबीज केली आहे. स्मार्टफोनची देशातील उलाढाल 1.90 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असून, त्यात चीनचा वाटा तब्बल 70 ते 75 टक्के आहे. दूरसंचार साहित्याची भारतीय बाजारपेठ 13 हजार कोटींची असून, त्यात चीनचा हिस्सा 23 ते 28 टक्के, इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती साहित्य याची उलाढाल 55 हजार कोटी असून, त्यातील चीनी उत्पादनाचे प्रमाण हे 10 ते 15 टक्के आहे. वाहनांचे सुटे भाग 10 ते 15 टक्के, इंटरनेट अँप 65 ते 70 टक्के, पोलाद 18 ते 23 टक्के, तर औषध निर्माण क्षेत्रातील वाटा 58 ते 62 टक्के इतका आहे.

ही संपूर्ण आकडेवारी पाहिली तर डोळे विस्फरायला लावणारी आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारकडून मागील पाच वर्षांपासून 'मेक इन इंडिया' कार्यक्रम राबवला जात असतानाही चिनी उत्पादने ही अशा प्रकारे भारतीय बाजारपेठ काबीज करत असतील, तर आपल्या व्यापारविषयक रणनितीत कुठेतरी गंभीर चूक झाली, असे आमदार रोहित पवारांचे मत आहे. याकडे आधीपासूनच लक्ष देण्याची गरज होती. पण हरकत नाही आज कोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची झालेली दशा आणि सीमेवर चीनकडून वारंवार केली जाणारी आगळीक याचा विचार करता ही चूक अजूनही आपण दुरुस्त करू शकतो.

त्यासाठी 'मेक इन इंडिया' आणि 'आत्मनिर्भर भारत' याचा  आपल्याला खूप प्रभावीपणे वापर करावा लागेल. केंद्र सरकार व सर्व राज्ये यांनी 'मेक इन इंडिया' आणि 'आत्मनिर्भर भारत' याचे केवळ नगारे न वाजवता त्याला खऱ्या अर्थाने ताकद दिली, तर बाजारातील चीनचे हे आक्रमण आपण थोपवू शकतो. प्रत्येक भारतीयामध्ये असलेली देशप्रेमाची भावनाही याला सहाय्यभूत करणारी आहे. जागतिक पातळीवर चिनविरोधात असलेल्या रोषाचाही आपल्या फायद्यासाठी खुबीने वापर करता येईल. याचा केंद्र व राज्य सरकार दोघेही विचार करतील, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.

याव्यतिरिक्त इतरही क्षेत्रात चीनने आपले हातपाय पसरले आहेत. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या या भारतात व्यवसाय करतात, पण त्यांचे मूळ मालक हे चिनी आहेत. चीनची भारतात होणारी निर्यात लक्षात घेतली, तर त्याकडे आपल्याला संधी म्हणूनही पाहता येईल. कारण हिच उत्पादनं तयार करुन आपण चीनच्या निर्यातीला लगाम लावू शकतो, याचा राज्यातील व देशातील उद्योजक व युवांनी जरुर विचार करावा. याशिवाय परदेशात काम करत असलेले मोठ्या प्रमाणातील भारतीय प्रोफेशनल पुन्हा भारतात येण्याचीही शक्यता आहे. त्यांनीही आपल्या टॅलेंटचा वापर करुन सध्या चीनकडून भारतात येतात, तशी उत्पादने सुरू करू शकले, तर आपल्यासाठी ही मोठी संधी असेल. मग अशा कंपन्यांना इन्कम टॅक्समध्ये सवलत देता येईल का किंवा इन्व्हेटमेंट ओरिएंटेड बेनिफिट देता येईल का, याचाही सरकारने विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख