म्हणून मला लोकांनी विधानसभेत पाठविले नाही ! वहाडणे यांचा असाही खुलासा - So people did not send me to the assembly! Such a revelation of Vahadane | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

म्हणून मला लोकांनी विधानसभेत पाठविले नाही ! वहाडणे यांचा असाही खुलासा

मनोज जोशी
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

मी नगराध्यक्ष व्हायच्या आधी 10 वर्षात झाली नाहीत इतकी कामे साडेतीन वर्षात केलेली आहेत. नगरपरिषदेला तुम्ही निधी मिळू दिलेला नाही, 5 नंबर साठवण तलाव व्हावा म्हणून मी प्रयत्न करत होतो, पण तुम्ही अडथळेच आणले म्हणून जनतेने तुमचा पराभव केला.

कोपरगाव : विधानसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल मला मान्य आहे. नगरपरिषद पुन्हा कोल्हे गटाच्या कब्जात जाऊ नये म्हणून जनतेने मला विधानसभेत पाठविले नाही. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदारांना असलेले तीस हजारांचे मताधिक्य कुठे गेले? असा जाहीर सवाल नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी युवानेते विवेक कोल्हे याना केला आहे.

पत्रकात त्यांनी म्हंटले की, मी नगराध्यक्ष व्हायच्या आधी 10 वर्षात झाली नाहीत इतकी कामे साडेतीन वर्षात केलेली आहेत. नगरपरिषदेला तुम्ही निधी मिळू दिलेला नाही, 5 नंबर साठवण तलाव व्हावा म्हणून मी प्रयत्न करत होतो, पण तुम्ही अडथळेच आणले म्हणून जनतेने तुमचा पराभव केला. नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत अनेकदा अडथळे तुम्हीच आणले. नवीन पाणी पुरवठा योजनेवर देखरेख करणाऱ्या संस्थेला तुम्हीच हाकलून लावले, त्याच निसर्ग कॅन्सल्टन्सी संस्थेने आता वसुलीसाठी नगरपरिषदेवर दावा ठोकला आहे.

निकाल विरोधात गेला तर होणारे प्रचंड आर्थिक नुकसानीला जबाबदार कोण? तुमच्यापैकी कुणी किती पैसे त्या योजनेच्या ठेकेदाराकडून उकळले याचा शोध घ्या. मेन लाईनवर नळजोड घेऊन प्रचंड पाणी वापरणारे पाणीचोर तुमच्याच भोवती आहेत. नेत्यांत धमक असेल, तर त्यांनी त्यांच्याच चेल्याना मेन लाईनवरील त्यांचे नळजोड स्वतःहून तोडण्याचे आदेश द्यावेत. काही नगरसेवक ठेकेदारांना दमबाजी करून काही कामात भागीदार आहेत. त्या कामांचे बिल द्या, असे मला आजही सांगताहेत.

डॉ. आंबेडकर मैदानाचे व अनेक रस्त्याच्या कामाचे कार्यदेश दिलेले आहेत. अनेक वर्षे नगरपरिषद ताब्यात असतांना काही करायचे नाही व सत्ता हातातून गेल्यावर बोंब मारायची, हे डावपेच बंद करा, असे ही शेवटी वाहडणे यांनी म्हंटले आहे.

वहाडणे यांनी काढलेल्या या पत्रकामुळे तालुक्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विकास कामे करताना वहाडणे यांनी प्रयत्न केले. विकास कामे करताना स्वतः कामाच्या ठिकाणी उपस्थित राहून पाहणी करीत ठेकेदारांचीही धावपळ उडवून दिली. नागरिकांच्या प्रश्नांसाठी सतत पुढे येत असल्याने नागरिकांमधून विशेष चर्चिले गेलेले वहाडणे यांना मात्र मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत अत्यल्प मते मिळाली होती. परंतु या अपयशाने खचून न जाता त्यांनी कामे सुरूच ठेवली. आता कोल्हे यांना शाब्दिक टोला मारत त्यांनी आपल्या पराजयाचे रहस्यही टिकात्मक पद्धतीने मांडले, हे महाराष्ट्रात विशेष चर्चेचे ठरले आहे.

 

Edited By -Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख