सोनई : ग्रामपंचायतमध्ये हमखास सदस्य होण्याची खात्री असल्याने जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख गटाकडून उमेदवारी करण्या साठी इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. मतदारांनीच सर्वानुमते उमेदवार देण्यासाठी आज सहाही प्रभागात बैठकाचे आयोजन करण्यात आले आहे.
येथे सहा प्रभागात सतरा जागांसाठी निवडणूक होत आहे. ग्रामपंचायतीत गडाख गटाची एकहाती सत्ता असल्याने उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांचा आटापिटा सुरू झाला आहे. उमेदवारास शिक्षणात सातवी शिकल्याची अट असल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे.
जिल्हा परिषद अर्थ व पशुसंवर्धन सभापती सुनिल गडाख यांनी प्रत्येक प्रभागातील मोजक्या कार्यकर्त्यांची बैठक घेवून प्राथमिक चाचपणी केली. सर्वाना मतदारांची बैठक घेवून सर्वानुमते उमेदवार देण्याची सूचना त्यांनी केली. उद्या (सोमवारी) मुळा कारखान्यावर उमेदवार चाचपणीची दुसरी फेरी होणार आहे. संघटनेचा.पात्र व अर्ज भरुन घेण्याचा प्रयत्न आहे.
मंत्री गडाख व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावात मोठ्या प्रमाणात निधी आणून विकास कामे झालेली आहेत. गडाख गटाबद्दल ग्रामस्थ समाधानी आहेत, मात्र
ग्रामपंचायत पदाधिकारी व काही सदस्यांबाबत मोठा नाराजीचा सूर आहे. मनमानी, दादागिरी व ठेकदारी हा विषय कळीचा मुद्दा ठरु शकतो. अर्ज भरण्याअगोदरच संभाव्य उमेदवारांचा खर्च सुरू झाला आहे. दरम्यान, मंत्री गडाख याबाबत कोणाला नियुक्त करणार, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागणार आहे.
मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी खरवंडी बिनविरोधचा संकल्प
खरवंडी (ता. नेवासे) येथे झालेल्या ग्रामसभेत सर्व राजकिय गटातील कार्यकर्त्यांनी संघर्ष आणि पैशाची उधळपट्टी टाळून ग्रामपंचायत निवडणूक
बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला.
सर्वच इच्छुकांच्या चिठ्ठया टाकून प्रभागानुसार पंधरा नवीन सदस्यांच्या चिठ्ठया काढण्यात आल्या आहेत. मागील पंचवार्षिक निवडणुकीत सहा पॅनलचे 96 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. ही निवडणूक तालुक्यात गाजली होती. या निवडणुकीनंतर गावात मोठ्या प्रमाणात तेढ निर्माण झाली होती. पुन्हा अशी स्थिती होऊ नये म्हणून माजी सरपंच शिवाजी फाटके यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा होवून गावातील महादेव मंदीर, खंडोबा मंदीर व ख्रिश्चन बांधवाच्या प्रार्थनास्थळाचा जिर्णोध्वार करण्यासाठी निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय झाला. ग्रामसभेत प्रभागानुसार इच्छुकांची नावे घेण्यात आली. यानंतर सर्वानुमते पंधरा जागेसाठी चिठ्ठया काढण्यात आल्या. भाग्यवान सदस्य याप्रमाणे शिवाजी कुऱ्हे, गोरक्षनाथ शिंदे, यमुना कुऱ्हे, संतोष बिचकुल, संगिता राजळे, वर्षा मिसाळ, आण्णासाहेब बेल्हेकर, प्रियंका भोगे, सुशिला फाटके, हिरा बर्डे, गणेश खाटीक, सुवर्णा भोगे, गणेश फाटके, मनिषा म्हस्के, हर्षदा भोगे हे आहेत.
मोरयाचिचोंरेत सहमती
आदर्शगाव मोरयाचिचोंरे येथे जिल्हा परिषद अर्थ व पशुसंवर्धन सभापती सुनिल गडाख यांच्या प्रयत्नातून अंबादास इलग गटाचे चार व पंढरीनाथ मोरे गटाचे चार सदस्य व एक सहमतीने त्रयस्थ उमेदवार घेऊन ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा निर्णय झाला. त्रयस्थ म्हणून लता मोहन बर्डे यांचे नाव नक्की केले आहे.
Edited By - Murlidhar Karale

