कोपरगाव : तालुक्यातील 29 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजप प्रदेश सचिव, माजी आमदार स्नेहलता कोल्हे गटाने बाजी मारत 20, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आशुतोष काळे 7, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे गटास एक, तर एके ठिकाणी काळे-कोल्हे-जाधव यांच्या गटाने झेंडा फडकावला.
युवा नेते विवेक कोल्हे यांनी निवडणूक हाती घेत, गावनिहाय पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका घेत नेतृत्व सिद्ध केले. संवत्सर ग्रामपंचायतीत जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी विरोधकांना चारी मुंड्या चीत केले. मात्र, त्यांचे 17-0चे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. कोकमठाण येथे 35 वर्षांची कोल्हे गटाची सत्ता उधळून लावत मतदारांनी काळे गटाला कौल देत सत्तांतर केले.
279 ग्रामपंचायत सदस्यांपैकी कोल्हे गटाचे 144, काळे गटाचे 112, परजणे गटाचे 20, तर तीन अपक्ष उमेदवार विजयी झाले. पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत काळे गटाने बाजी मारली होती. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीत कोल्हे गटाने वचपा काढला. मळेगाव थडी, रवंदा, वेळापूर, नाटेगाव कासली, आपेगाव, आंचलगाव, देर्डे चांदवड, धोंडेवाडी, अंजनापूर, काकडी, घारी ग्रामपंचायती काळे गटाकडून कोल्हे गटाने खेचून आणल्या. सवंत्सर येथे परजणे गटाची सत्ता अनेक वर्षांपासून आहे. काळे-कोल्हे गटाने येथे मोठे बळ लावले. मात्र, परजणे यांनी सत्ता कायम राखली. 17 पैकी 14 जागा परजणे, 2 कोल्हे, तर एका जागेवर काळे गटाचा विजय झाला. धोंडेवाडी, वेळापूर व कासली येथे प्रत्येकी एक अपक्ष विजयी झाला. तालुक्यातील मायगाव देवी 9 व तिळवणी येथे सर्व 7 जागांवर काळे गटाला निर्विवाद बहुमत मिळाले.
विजयी उमेदवार ः देर्डे चांदवड- प्रतिमा होन (195) विरोधी मुक्ताबाई होन (196 मते), घारी- वृषाली पवार (136) विरोधी संगीता पवार (137), आपेगाव- सोनाली भुजाडे (253) विरोधी मंगल भुजाडे (254), उक्कडगाव- दादासाहेब त्रिभूवन (274) विरोधी अजित त्रिभूवन (273).
Edited Bhyy - Murlidhar Karale

