नगर : भाजपचे माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांची नुकतीच भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती होऊन त्यांची राजकारणात एन्ट्री झाली. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात करिअर करण्यास निघालेल्या अक्षय यांच्या दृष्टीने आजचे रक्षाबंधन काही खासच आहे. राजकारणात सक्रीय असलेल्या बहिणींची माया, राजकारणातील मातब्बर असलेल्या दाजींच्या शुभेच्छा त्यांच्यासाठी मोलाच्या ठरणार आहेत.
राहुरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार कर्डिले यांनी बुऱ्हाणनगरच्या सरपंचपदापासून ते थेट मंत्रीपदापर्यंत मजल मारली. एक दुधवाला थेट मंत्री झाला. एव्हढेच नव्हे, तर तब्बल 25 वर्षे आमदार राहून नगर जिल्ह्याच्याच नव्हे, तर महाराष्ट्राच्या राजकारणावर छाप पाडली. अनेक महत्त्वाच्या निवडणुकांत, राजकीय घडामोडींमध्ये `किंगमेकर`ची भूमिका बजावली. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्डिले यांच्यासाठी राहुरीत सभा घेतली होती. उत्तम जनसंपर्क, सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेल्या या नेत्याचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांनी युवकांमध्ये आपले वेगळे कतृत्त्व सिद्ध केले आहे.
अक्षय यांचे प्राथमिक शिक्षण बुऱ्हाणनगरला झाले. माध्यमिक शिक्षण पुणे येथे होस्टेलवर राहून पूर्ण केले. बी.एससी. (गणित) या विषयात पदवीधर झाल्यानंतर एम.बी.ए. (एचआर) शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली आहे. राजकारणाचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले असून, राजकारणात वडील हेच त्यांचे गुरू आहेत. महाविद्यालयीन जीवनात वडिलांच्या सभांचे नियोजन करताना त्यांच्या कामाची चुनूक दिसून आली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी अनेक आंदोलने केली. आता पक्षाचे पद घेवून खऱ्या अर्थाने राजकारणात झेप घेण्यासाठी ते सज्ज झाले आहेत.
अक्षय यांना चार बहिणी आहेत. त्यापैकी तीन नगरमध्येच राजकारणात दिग्गज असलेल्या परिवारात आहेत. पहिली कोतकर यांच्या परिवारात, दुसरी जगताप, तिसरी गाडे, तर चाैथी औरंगाबाद येथील वाकडे यांच्या परिवारात आहेत. अक्षय यांची मोठी बहिण सुवर्णा कोतकर यांनी यापूर्वी नगरचे उपमहापाैर हे पद भूषविले आहे. त्यांचे पती संदीप कोतकर माजी महापाैर आहेत. दुसरी बहिण शीतल जगताप या सध्या नगरसेविका असून, त्यांचे पती आमदार संग्राम जगताप हे महाराष्ट्रात युवा आमदारांपैकी आहेत. तिसरी बहिण ज्योती गाडे याही नगरसेविका आहेत. त्यांचे पती अमोल गाडे हे उद्योजक आहेत. चाैथी बहिण कोमल वाकडे या औरंगाबादला असतात. त्यांचे पती राहुल वाकडे उद्योजक आहेत.
मी राज्याच्या राजकारणात जावे, ही बहिणींची इच्छा
बहिणींबाबत अक्षय सांगतात, ``तीन बहिणी राजकारणात असल्याने राजकीय जीवनात काम करताना त्यांचा सल्ला माझ्यासाठी महत्त्वाचा ठरतो. माझे काही चुकल्यास त्या आवर्जुन सांगतात. तसेच दाजी आमदार संग्राम जगताप यांचेही वारंवार मार्गदर्शन लाभते. विविधप्रश्नी विधानसभेत आवाज उठवून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. मी राजकारणात सक्रीय होऊन भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणात जावे, अशी या सर्वांची इच्छा आहे. ती मी नक्कीच पूर्ण करील. आई अलकाताई यांचे संस्कार मला कामे येतात. सामाजिक जिवनात वावरताना त्यांनी सांगितलेल्या अनेक `टीप्स` माझ्यासाठी महत्त्वाच्या असतात. रक्षाबंधनाला जेव्हा बहिणी घरी येतात, तेव्हा घर गोकुळ बनते. आम्ही धम्माल करतो. आमदारांची मुले म्हणून आम्ही भावंडे कधीच वागलो नाहीत. सर्वसामान्यांप्रमाणेच आमचे वागणे असते. आम्हाला लहानपणीचे दिवस आठवतात. मस्त दंगामस्ती करायचो. रक्षाबंधन आले की आमचा उत्सव वेगळाच असायचा. मला आधी राखी कोण बांधणार यावरूनही चाैघींमध्ये अनेकदा स्पर्धा असायच्या.``
सामाजिक कामांतून पक्ष पुढे जाणार
आगामी काळात राजकारणात युवकांचे संघटन करून भाजप पक्ष पुढे नेण्याचे काम करणार आहे. वडिलांनी यापूर्वी मंत्रीपदे भुषविली आहेत. 25 वर्षे ते आमदार राहिले आहेत. त्यांचे काम मी बालपणापासून पाहत आहे. त्यांनी पक्षासाठी मोठे काम केले आहे. नगर जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचे मोठे वर्चस्व आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यात अग्रेसर राहून युवकांना रोजगार देण्यासाठी माझी धडपड आहे. सध्या बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आगामी काळात कंपन्या, संस्थांच्या माध्यमातून युवकांना रोजगार देण्यासाठी माझे विशेष प्रयत्न सुरू आहेत. राहुरी मतदारसंघातील अनेक प्रश्नांबाबत वडिलांकडे लोक रोज येतात. आमदार असताना भरत असलेला `जनतेचा दरबार` आमच्या घरी अद्यापही रोजच भरतो. उलट जास्त लोक कामे घेवून येतात. प्रशासकीय पातळीवर वडिलांचा `वट` आहे. ते लगेचच अधिकाऱ्यांना फोन करून कामे सोडवितात. लोक समाधानी होतात. हे त्यांचे काम मला खूपच भावते. लोकांच्या चेहऱ्यावरील समाधान मला स्फुर्ती देऊन जाते. कोरोना महामारीच्या कालावधीत मतदारसंघातील गरजुंना किराणा वाटप केले. मी स्वतः वाटपासाठी फिरलो. लोकांना वेळोवेळी मदत होणे खूप आवश्यक असते, ते मी अनुभवले. कामातून खूप शिकलो, अजूनही कायम शिकतच राहणार आहे. मी राजकारणात सक्रीय व्हावे, अशी युवा कार्यकर्त्यांची खूप इच्छा होती. आता कुटुंबिय, आप्तेष्टांबरोबरच सर्व युवा मित्र, जनतेचा मला आशिर्वाद आहे. त्यामुळे आगामी काळात मी वेगळे काम करून दाखवेल, असे मत अक्षय कर्डिले यांनी `सरकारनामा`शी बोलताना व्यक्त केले.

